- रायबाग तालुक्यातील हंडीगुंद येथील घटना
- अपघातानंतर कारचालक फरार
रायबाग / वार्ताहर
बेळगाव जिल्ह्याच्या रायबाग तालुक्यातील हंडीगुंद गावाच्या हद्दीत कार अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर कारमधील अन्य एकजण किरकोळ जखमी झाले आहेत. महालिंग गुरुपद निंगनूर (वय ४७) व इराप्पा चन्नाबसू उगारे (वय ३२) दोघेही राहणार पलभावी (ता.रायबाग) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, चालकाच्या बेजबाबदारपणामुळे कार रस्त्यानजीक असलेल्या हेस्कॉमच्या विद्युत खांबाला धडकली आणि पलटी झाली. ही धडक इतकी जोराची होती की, महालिंग व इराप्पा दोघेही जागीच गतप्राण झाले. तर कारमधील इमाम राजेसाब सनदी हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर हारुगेरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कार पलटी झाल्याने कार चालक सद्दाम हतलसाब पठाण कार सोडून पळून गेला आहे. या घटनेची नोंद हारुगेरी पोलिस स्थानकात झाली असून फरार कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments