• जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची सूचना 
  • जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती प्राधिकरणाची बैठक 

बेळगाव / प्रतिनिधी 

यंदा मान्सून चांगला राहण्याचा अंदाज असल्याने पूरस्थिती निर्माण झाल्यास सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून संभाव्य पूरस्थिती नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना राबवा अशा सूचना जिल्हा आयुक्त नितेश पाटील यांनी दिल्या.

बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन बैठकीच्या स्थानावरून ते बोलत होते. बेळगावसह जिल्ह्यातील पडण्याची शक्यता असणारी झाडे ओळखून संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी अशी झाडे तातडी काढण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पावले उचलावीत, तसेच विजेचे खांब झुकत असतील तर ते दुरुस्त करण्यासाठी पावले उचलावीत. झाडांच्या फांद्या वीज तारांना स्पर्श करत असल्यास, खबरदारीचा उपाय योजावे, पावसामुळे अनेक संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून, आरोग्य विभागाने जनजागृती करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, जनतेला पिण्यासाठी पुरवण्यात येणाऱ्या पाण्याची चाचणी करून योग्य वाटल्यास पुरवठा करण्यात यावा. जनतेला पाणी उकळून प्यायला सांगावे, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

नदीकाठच्या भागातील वस्त्यांमध्ये पुराबाबत जनजागृती करण्यात यावी आणि लोकांना त्यांच्या पशुधनासह सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी प्रबोधन करावे. कोणत्याही कारणास्तव मोडकळीस आलेल्या शाळा इमारती व अंगणवाडी केंद्रांमध्ये वर्ग होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास एसडीआरएफ टीमने लोक आणि गुरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक बचाव उपकरणांसह सज्ज रहावे. पूरस्थितीत आवश्यक असलेली संरक्षक उपकरणे चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करण्याबरोबरच अधिक संरक्षक उपकरणे आवश्यक असल्यास त्यासाठी प्रस्ताव सादर करावा, पूर आल्यास गुरांसाठी आवश्यक चारा व औषधांचा साठा ठेवावा. गोठ्याच्या सुरक्षेसाठी गोशाळा सुरू करण्यासाठी योग्य जागा शोधण्यात यावी, पावसामुळे रस्ते व विजेचे खांब खराब झाल्यास असे रस्ते व विद्युत खांब तातडीने दुरुस्त करण्याची कार्यवाही करावी. पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यात कोणताही व्यत्यय येऊ नये, तसेच वरच्या जलसाठ्यांची स्थिती तपासून त्यांच्या स्वच्छतेबाबत कार्यवाही करावी, लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व तलावांच्या स्थितीचा आढावा घेण्यात यावा, बॅरेजेसचे दरवाजे तपासावेत अशा महत्वपूर्ण सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

या बैठकीला जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, महापालिका आयुक्त पी.एन.लोकेश यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.