• पिण्याचे पाणी व चाऱ्याची कमतरता भासू नये याची दक्षता घ्या 
  • जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या सूचना 
  • जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ व्यवस्थापन , मान्सूनपूर्व तयारी बैठक 

बेळगाव / प्रतिनिधी 

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या दुष्काळी परिस्थिती असतानाही यावेळी चांगला पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर बी-बियाणे व खतांचा पुरवठा करण्याची तयारी ठेवावी. लोक व पशुधनाला पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात झालेल्या दुष्काळ व्यवस्थापन आणि मान्सूनपूर्व तयारीबाबतच्या बैठकीत ते बोलत होते.

पिण्याच्या पाण्याची व जनावरांसाठी चाऱ्याची कमतरता भासू नये यासाठी दक्षता घ्यावी. यावेळी चांगला पाऊस अपेक्षित असल्याने पाण्याचा प्रवाह सुरळीत होण्यासाठी बेळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध भागातील नाले, खड्डे यांच्या सभोवतालची स्वच्छता करण्यात यावी. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन शहरातील पावसाळ्यातील परिस्थितीचे पुरेसे व्यवस्थापन करण्यासाठी नियोजन करावे, असेही ते म्हणाले.

  • बनावट बियाणे - खतांपासून सावधगिरी बाळगा : 

पाऊस सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना बनावट बियाणे किंवा खतांचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्यास अशा प्रकरणांची काळजी घ्यावी, अशी सूचनाही मंत्री जारकीहोळी यांनी केली. 

  • घर नुकसान भरपाईसाठी योग्य सर्वेक्षणाची सूचना :

२०१९ मध्ये, घराच्या नुकसानीची भरपाई देताना काही त्रुटी राहिल्या होत्या. बहुतांश भागात घराच्या प्रवेशद्वाराजवळ गुरांचे गोठे आहेत. तसेच जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा लोक खबरदारीचा उपाय म्हणून घरे रिकामी करून इतरत्र राहतात. अशी घरे पडल्यास भरपाई मिळत नाही. अशा बाबींवर लक्ष ठेवावे, अशा सूचना मंत्री सतीश जारकीहोळी यांनी यावेळी दिल्या. बेळगावसह शहरी भागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव याबाबत व्यापक चर्चा सुरू असून, जनतेला त्रास होऊ नये, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

  • दुष्काळामुळे पिकांच्या नुकसानीसाठी ३१६ कोटींची भरपाई जाहीर : जिल्हाधिकारी नितेश पाटील

बेळगाव जिल्ह्यात २०२३-२४ च्या पावसाळ्यात दुष्काळामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीमुळे ३,७४,०६६ शेतकऱ्यांना ३१६ कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई देण्यात आली आहे. आधार सीडिंग आणि खाते बंद करण्यासह २३ हजार शेतकऱ्यांची भरपाई जमा होणार असून इतर शेतकऱ्यांना नुकसान  भरपाईची रक्कम मिळणे अशक्य आहे. याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात येत असून तांत्रिक अडचण दूर करण्यात येत आहे. याशिवाय बाकी शेतकऱ्यांनाही दिलासा देण्यासाठी पावले उचलली जात असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.काही ठिकाणी पडीक जमिनीत पेरणी केली जात नाही, अशा संबंधित जमिनींना मोबदला दिला जात नसल्याचे त्यांनी सांगितले.

१०५ गावांना दररोज ६३० टँकर फेऱ्यांद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. इतर ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या नाही. ठिकठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या चारा बँकांमधूनही ५८० टन चारा पुरवठा केला जाणार आहे. महाराष्ट्रातील जलाशयांमध्ये भरपूर पाणीसाठा आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पाणी सोडल्यास त्याचा फायदा होईल. दुष्काळ व्यवस्थापनासाठी ३५ कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. आर्थिक समस्या नाही. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तलाव गाळण्यासाठी निविदा मागविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

यावेळी कृषी विभागाचे सहसंचालक शिवनगौडा पाटील यांनी बियाणे व खतांच्या साठ्याबाबत माहिती दिली.  

या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, बेळगाव महापालिकेचे आयुक्त पी. एन. लोकेश यांच्यासह जिल्हा पंचायत, पशुसंवर्धन विभाग, शहर पाणीपुरवठा मंडळ, ग्रामीण पेयजल, केयूआयडीएफसी आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.