- अन्य दोघांची प्रकृती गंभीर
अथणी / वार्ताहर
कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत एक महिला ठार तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. बेळगाव जिल्ह्याच्या अथणी तालुक्यातील चिक्कट्टी गावाच्या हद्दीत अथणी लघु औद्योगिक वसाहतीत एका कारखान्यात ही दुर्घटना घडली. शोभा तेली असे स्फोटात मृत्यमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, अथणी लघु औद्योगिक वसाहतीतील प्रिया एक्सपोर्ट इंडस्ट्रियल युनिटमध्ये बॉयलरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत शोभा तेली, सुनंदा सिद्धप्पा तेली (वय ३६ रा.सत्ती) यांच्यासह अन्य एक असे एकूण तिघेजण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र यापैकी शोभा तेली यांचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. तर अन्य दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अथणी सरकारी रुग्णालय व महाराष्ट्राच्या मिरज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्फोटाच्या तीव्रतेने कारखान्याच्या भिंतींनाही तडे गेले. त्यामुळे औद्योगिक वसाहत परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान गतीनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेची नोंद अथणी पोलिस स्थानकात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
0 Comments