- तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीनंतर गजबजले शाळेचे आवार
![]() |
सुळगा (उ.) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेत विद्यार्थांचे स्वागत करताना शिक्षक-शिक्षिका |
बेळगाव / प्रतिनिधी
उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर २०२४-२०२५ शैक्षणिक वर्षाला शुक्रवारी प्रारंभ झाला. त्यामुळे सुमारे दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार गजबजले. नवा उत्साह, नव्या आकांक्षा समोर ठेवत विद्यार्थ्यांनी नवीन इयत्तेत प्रवेश केला. प्रदीर्घ सुट्टीनंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्राला प्रारंभ झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर "थोडी खुशी-थोडा गम" असे चित्र पाहायला मिळाले.
बेळगाव मधील सरदार्स हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या स्वागतकमानी आकर्षक पद्धतीने सजवण्यात आल्या होत्या. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षकांनी जय्यत तयारी केली होती. गेल्या दोन दिवसांपासून याच कामात व्यस्त असणाऱ्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत केले. मिठाई आणि खाऊ वाटप करत मुलांसोबत शिक्षकांनीही आनंद व्यक्त केला.
यावेळी सरदार्स हायस्कूलचे मुख्याध्यापक शिवशंकर साधिमनी म्हणाले, आज पासून नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाल्याने शाळेत उत्साहाचे वातावरण होते. दोन दिवसांपासून शिक्षक वर्गाने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आणि नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभासाठी जय्यत तयारी केली होती, असे त्यांनी सांगितले.
याचप्रमाणे वनिता विद्यालय शाळेत देखील मुलांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. शाळेसमोर काढण्यात आलेली रांगोळी लक्षवेधी ठरत होती.
बेळगाव शहराप्रमाणे तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली होती. तालुक्याच्या ग्रामीण भागातील सुळगा (उ.) सरकारी प्राथमिक मराठीशाळेतही फुले उधळून बँडच्या तालावर विद्यार्थ्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.
शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक तसेच पालकांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. शाळेत पहिले पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी खाऊवाटप करून आकर्षक पद्धतीने शाळा सजवून शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यात आला.
शाळेच्या पहिल्या दिवशी शंभर टक्के उपस्थिती नसली तरी मुलांच्या उपस्थितीने शाळा आवारे गजबजून गेली. शाळा परिसरात सकाळपासूनच विद्यार्थी आणि पालकांची ये-जा सुरू होती. दप्तर अडकून पालकांसोबत शाळेला जाणारी मुले, शाळांच्या वेळेनुसार सोडायला जाणारे आणि शाळा सुटताच पाल्याला घरी घेऊन येणारे पालक यामुळे शाळा आवारातील रस्त्यांवर पालक व मुलांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होती. तर रिक्षावाल्या मामांची वर्दी सुरू झाल्याने रिक्षा मामा ही आपली ड्युटी बजावत होते.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बोलते करत सुट्टीतील मज्जा, गमती-जमती याबाबत विचारून वातावरण प्रसन्न ठेवले. एकंदरीत दंगा - मज्जा - मस्ती बरोबरच आपला परिचय करून देणे, नवीन मित्रांची ओळख यामध्ये शाळेचा पहिला दिवस उत्साहात निघून गेला.
0 Comments