खानापूर / प्रतिनिधी 

खानापूर-जांबोटी मार्गावरील बाचोळी कत्री (शनया) समोर ॲक्टिवा दुचाकीला ट्रकने पाठीमागून ठोकल्याने एक जण ठार झाल्याची घटना आज दुपारी १२.३० च्या दरम्यान घडली आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील शिवठाण येथील युवक विदेश तुकाराम मिराशी (वय २८) हा आपल्या मित्रासह शुभम गार्डन येथील एका लग्न समारंभासाठी ॲक्टिवा दुचाकीवरून जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या एका ट्रकने धडक दिल्याने पाठीमागे बसलेला त्याचा मित्र बाजूला उडून पडला तर विदेश तुकाराम मिराशी रस्त्यावरच पडल्याने ट्रकचे चाक त्याच्या मांडीवरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला असता तेथील नागरिकांनी त्याला तातडीने खानापूर सरकारी रुग्णालयात दाखल केले. परंतु त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

सदर ट्रक एका लग्नाचे वऱ्हाड घेऊन लग्नकार्यासाठी जात होता अशी माहिती प्राप्त झाली आहे. अपघात होताच ट्रक चालक ट्रक न थांबवताच तसाच पुढे निघून गेल्याचे समजते. याबाबत खानापूर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली असून खानापूर पोलिस अधिक तपास करीत आहेत. पोलिस व डॉक्टरांना पंचनामा व कायदेशीर बाबी लवकर पूर्ण करण्यास सांगितले असून शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.