• उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
  • महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ चंदगड तालुक्यात प्रचारसभा
  • विरोधी इंडिया व महाविकास आघाडीवर साधला जोरदार निशाणा 

चंदगड / संतोष नाईक 

देशाचं एक कणखर नेतृत्व म्हणून मोदींच्याकडे पाहिलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला सव्वीस पक्षाची खिचडी आहे. त्या इंडिया आघाडीत फक्त इंजिन आहेत, त्यात केवळ नेत्यांच्या मुलांसह नातेवाईकांना जागा आहे. सामान्य जनतेला त्यामध्ये अजिबात जागा नाही. तुमच्यासाठी जागा फक्त मोदींच्या गाडीमध्ये आहे. 

महायुती ही विकासाची गाडी असून, या गाडीला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासारखे मजबूत इंजिन आहे. या गाडीला वेगवेगळ्या पक्षांचे  डबे जोडले गेल्याने सर्वांना यामध्ये बसण्याची संधी आहे, त्यामुळे 'सबका साथ सबका विकास' म्हणत ही गाडी वेगाने पुढे जात आहे, असे सांगतानाच  ज्या क्षणी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या धनुष्य बाणाचे बटन दाबता त्याच क्षणी कोल्हापूर मतदारसंघाची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लागते आणि मग या मतदारसंघाला विकासापासून कोणीही थांबवू शकत नाही असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. चंदगड तालुक्यातील इनाम सावर्डे येथे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी इंडिया व महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस  पुढे म्हणाले, देशाचे नेतृत्व कोणाच्या हाती द्यावे हे ठरवणारी व देशाची सुरक्षितता, आव्हाने पेलणारी ताकत असणाऱ्या नेतृत्वाला निवडून देण्याची ही निवडणूक आहे. विकास पुरुष नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षांच्या पाठबळाने मजबूत महायुती तयार करण्यात आली आहे. दुसरीकडे २६ पक्षांची खिचडी आहे. यामध्ये कोणीच कोणाला नेता मानायला तयार नाही. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील महायुती ही विकासाची गाडी आहे. या गाडीला नरेंद्रजी मोदी यांच्यासारखे मजबूत इंजिन आहे. या गाडीला वेगवेगळ्या पक्षांचे डबे जोडले गेले आहेत. 'सबका साथ सबका विकास' म्हणत ही गाडी वेगाने पुढे जात आहे. या डब्यांमध्ये  सर्वांना बसण्याची संधी आहे. ही विकासाची गाडी मतदारांनी आणखी वेगाने पुढे न्यावी असे आवाहन केले. दुसरीकडे इंडिया व महाविकास आघाडीवर टीका करताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी 'इंजिन नसलेली गाडी' असा उल्लेख केला. या गाडीत प्रत्येकजण 'मीच इंजिन आहे' असा दावा करत  आहे. इंजिनमध्ये बसण्याची जागा ही सर्वसामान्यांना नसते, केवळ ड्रायव्हरच बसतो त्यांच्या इंजिनमध्ये केवळ सगेसोयरे यांना बसण्यासाठीच जागा असून सर्वसामान्यांना जागा नाही असे सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे नाव घेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. 

उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशात परिवर्तन घडविले. त्यामुळे जगात 'मोदी मॉडेल'ची चर्चा होत आहे. देशातील 60 कोटी जनतेला त्यांच्या घरापर्यंत शुद्ध पाणी देण्याचे काम जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून करण्यात आले. त्याचबरोबर तरुण उद्योजकांना विनातारण दहा लाखापर्यंतचे मुद्रा लोन देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न केला. देशातील 80 लाख बचत गटांना आठ लाख कोटींचा निधी देण्यात आला. या माध्यमातून महिलांना लखपती दीदी बनवून सक्षम बनवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केले. महिलांना भागीदार करून घेतलेले देश विकसित होतात. याचे महत्त्व समजून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महिलांना 33 टक्के आरक्षण, त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्याचे काम केले आहे. दलित समाजातील लाखो तरुणांना उद्योजक बनवण्याचे तसेच आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून परिवर्तन घडविले आहे. देशातील गोरगरीब जनतेला पुढची पाच वर्ष अन्नधान्य मोफत देण्याची घोषणा देखील पंतप्रधानांनी केली आहे. त्यामुळे देशाला आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासारख्या सशक्त  व द्रष्टा नेत्याची गरज आहे. 



  • कोरोना काळात मोदीजींचे महत्त्वपूर्ण काम :

कोरोना महामारीच्या काळात देशातील सर्व शास्त्रज्ञाना एकत्रित करत भारत देशातच कोविड लसीची निर्मिती करण्याचे महत्वपूर्ण काम पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केले. ही कोविड लस तयार करताना अनेक देशांनी त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र या दबावाला बळी न पडता देशातील 140 कोटी जनतेला मोफत कोविड लस उपलब्ध करून देण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले. असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारने कोरोना काळात केलेल्या कामावर प्रकाशझोत टाकला.

  • जगातील शंभर देशात मोदीजींचा डंका :


जगभरात निर्माण झालेल्या कोरोना महामारीत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील शास्त्रज्ञाने कोविडची लस तयार केली. ही लस केवळ भारतीयांनाच नव्हे तर मॉरिशिस देशासह इतर देशांना देखील देत त्या देशातील जनतेचे देखील प्राण वाचविण्यात आले. याचा दाखला देताना  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मॉरिसिसमध्ये घडलेल्या प्रसंगाची आठवण सांगितली. मॉरिस मध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाप्रसंगी आपण मॉरिशिसच्या राष्ट्रपतींना भेटलो त्यावेळी त्यांनी मोदीजींना धन्यवाद कळवा असा निरोप माझ्याकडून दिला, कारण आमचा देश जो जिवंत आहे तो केवळ मोदीजींच्याचमुळे असे मॉरिशिसच्या राष्ट्रपतीने आपल्याला सांगितल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे जगातील जवळपास शंभर देश मोदीजीच आमचे नेते आहेत असे सांगतात असे फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांना दिलासा देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केले आहे. अडचणीत सापडलेल्या या उद्योगाला संजीवनी देण्याचे काम त्यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्याला विकास निधीच्या माध्यमातून मोठी मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याने राज्याचा झपाट्याने विकास होण्यास मोठी मदत झाली. रस्ते विकासासाठी वर्षाला १३ लाख कोटी सरकार खर्च करत असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आवर्जून सांगितले.

  • चंदगडकरांनी आशीर्वाद द्यावा !

देशात पुन्हा एकदा रामराज्य यावे ही सर्वांचीच इच्छा आहे. असे सांगतानाच प्रभू श्रीरामांच्या हातात धनुष्यबाण आहे. त्यामुळे या निवडणुकीत धनुष्यबाणाचे बटन दाबून तिसऱ्यांदा मोदीजींच्या हातात देशाची सत्ता द्यावी असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत चंदगडकरांनी आशीर्वाद द्यावा असे आवाहन त्यांनी केले.


  • चंदगडमध्ये केवळ एमआयडीसीच नाही तर मोठे उद्योग देखील देऊ : 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणापूर्वी भाजपचे नेते व चंदगडचे सुपुत्र शिवाजीराव पाटील यांनी चंदगड तालुक्यात एमआयडीसीची मागणी केली. या मागणीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपलब्ध जागे संदर्भात कळवावे एमआयडीसी मंजूर करून असे आश्वासन दिले. या मागणीचा धागा पकडत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंदगड तालुक्यात केवळ एमआयडीसीच नाही तर मोठे उद्योग देखील आणले जातील असे आश्वासन दिले.

यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार राजेश पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री भरमुअण्णा पाटील, समरजीतसिंह घाटगे, उमेदवार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, हेमंत कोलेकर, अनिता चौगुले, जयश्री तेली, ज्योती काणे यांची भाषणे झाली. याप्रसंगी कलर्स मराठी वाहिनीवरील सुर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात निखिल मधाळे यांनी अंतिम फेरीत पोचल्याबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या प्रचार सभेस खासदार धनंजय महाडिक, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, समरजितसिंह घाटगे, माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील, शिवाजीराव पाटील, राहुल देसाई, संग्रामसिंह कुपेकर, अभय देसाई, दीपकदादा पाटील, सचिन बल्लाळ यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार राहुल देसाई यांनी मानले.