बेळगाव / प्रतिनिधी
उन्हाळी सुट्टीनंतर नव्या शैक्षणिक वर्षाला उद्या शुक्रवार (दि. ३१) मे पासून सुरवात होणार असल्याने पुन्हा सर्व शाळांचे आवार गजबजणार आहेत. सर्व माध्यमांची पाठ्यपुस्तके १ जूनपर्यंत देण्याचा प्रयत्न केला जाणार असून गणवेशाचे कापड १५ जूननंतर दिले जाणार आहे, अशी माहिती शिक्षण खात्याकडून देण्यात आली.
शाळा ३१ मे रोजी सुरू होणार असल्या तरी शिक्षक दि. २९ मे पासून शाळेत येत आहेत. वर्ग व शाळेची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय, माध्यान्ह आहाराची तयारी, शाळा प्रारंभोत्सवानिमित्त प्रभातफेरी याचे नियोजन करण्यात आले आहे. उद्या पहिल्या दिवशी विद्यार्थी व पालकांना माध्यान्ह आहार दिला जाणार आहे. पहिल्या दिवशी मागील वर्षाच्या अभ्यासक्रमाची उजळणी घेऊनच पुढील वर्षाच्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली जाणार आहे. यासाठी १ ते ३० जून या काळात सेतूबंध कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. शाळा परिसरात ५ जून रोजी पर्यावरण दिनानिमित्त रोपलागवड करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकारी व शिक्षकांना केल्या आहेत.
सर्व शिक्षकांनी दोन दिवस आधीच शाळेत दाखल होऊन प्रारंभोत्सवाची तयारी करण्याच्या सूचना जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यानुसार गटशिक्षणाधिकाऱ्यांनीही शाळांना भेटी देऊन तेथील सुविधांची पाहणी केली आहे.
शाळांना १ जूनपूर्वी टप्प्याटप्प्याने पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. गणवेशाच्या कापडासाठी निविदा निघाल्या असून प्रक्रिया संपताच कापड मिळणार आहे. त्यासाठी १५ जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
0 Comments