- शहर पोलिस आयुक्तांनी केली मिरवणूक मार्गाची पाहणी
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावमध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढली जाते. यावर्षी लोकसभा निवडणुकांमुळे शनिवार दिनांक ११ मे रोजी चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर पोलिस आयुक्त ईडा मार्टिन यांनी आज नरगुंदकर भावे चौकातील मध्यवर्ती शिवजयंती महामंडळाला भेट देऊन, चित्ररथ मिरवणूक मार्गाची पाहणी केली. तसेच शिवजयंती उत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून कायदा व सुव्यस्थेचे उल्लंघन न करता मिरवणूक शांततेत व लवकर पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत डीसीपी स्नेहा, डीसीपी रोहन जगदीश, प्रकाश मरगाळे आणि शिवजयंती महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पारंपरिक पद्धतीने उद्या सायंकाळी ६ वाजता नरगुंदकर भावे चौकात शिवरायांच्या पालखीचे पूजन करून चित्ररथ मिरवणूकीला मिरवणुकीला सुरूवात होणार आहे. त्यानंतर शहराच्या मध्यवर्ती भागातून भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. चित्ररथ मिरवणुकीत लाठीमेळा, लेझीम, ढाल तलवार, दांडपट्टा, झांजपथके, मर्दानी खेळ हे दृश्य शिवप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरणार आहे. त्यानंतर मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, यंदे खूट, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक, हेमू कलानी चौक, शनी मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल मार्गे कपिलेश्वर मंदिराजवळ मिरवणुकीची सांगता होणार आहे.
0 Comments