• वैयक्तिकरित्या केली आर्थिक मदत 
  • शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे दिले आश्वासन

सुळगा (हिं.) / वार्ताहर 

महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज रविवार (दि. २६) मे रोजी बेळगाव तालुक्यातील सुळगा (उ.) येथे सिलेंडर स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या वृद्ध दाम्पत्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन शोक व्यक्त केला.

शंकर गल्ली, सुळगा (उ.) येथे शनिवार दि. १८ मे रोजी सिलेंडर गॅस गळतीमुळे आगीचा भडका उडून येथील रहिवासी कल्लाप्पा यल्लाप्पा पाटील (वय ६५) आणि त्यांच्या पत्नी सुमन कल्लाप्पा पाटील (वय ६१) हे दोघेही गंभीर जखमी झाले होते. मात्र शुक्रवार दि. २४ मे रोजी सायंकाळी खाजगी इस्पितळात दाम्पत्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान आज मंत्री हेब्बाळकर यांनी मृत दाम्पत्याच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आणि वैयक्तिकरित्या आर्थिक मदत केली. तसेच शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. 

यावेळी युवराज कदम, सुळगा ग्रा. पं. उपाध्यक्ष भागाण्णा नरोटी, ग्रा. पं. सदस्य यल्लाप्पा कलखांबकर, ग्रा. पं. सदस्या निर्मला कलखांबकर, मनोज कलखांबकर,गणपत गडकरी, गंगाराम नरोटी आदि उपस्थित होते.