मुंबई : जेष्ठ अभिनेते अशोक सराफ व अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबईच्या वतीने १४ जून रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मनमाला टँक रोड, माटुंगा येथे सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात अभिनेते अशोक सराफ व अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. 

मागील तीन वर्षांपासून पुरस्कारांचे वितरण करण्यात आले नव्हते. नाट्य परिषदेची निवडणूक पार पडताच, कमी वेळात तातडीने नवनिर्वाचित नियामक मंडळाने जीवनगौरव पुरस्कार देण्याचे योजिले आहे.

नाट्य क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या नाट्यकर्मींचा सन्मान नाट्य परिषदेच्या वतीने दरवर्षी केला जातो. यानिमित्ताने कलावंतांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच १०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त घेण्यात आलेला ‘नाट्यकलेचा जागर’ यातील सर्वोत्कृष्ट पारितोषिक प्राप्त एकांकिका, बालनाट्य, एकपात्री, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन, नाट्य अभिवाचन कार्यक्रम यानिमित्ताने सादर होणार आहेत.