• बैलहोंगल येथील प्रचारसभेत भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांचे जनतेला आवाहन 



बैलहोंगल : भारताला जगात प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेले अभिमानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याची संधी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मिळाली आहे. यावेळी नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी आपण सर्वांनी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत. मी सर्वांच्या सहकार्याने बेळगाव लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहे. तेव्हा आगामी निवडणुकीत भाजपला मतदान करून मोदींचे हात बळकट करण्यासाठी मला म्हणजेच भाजपच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन जगदीश शेट्टर यांनी केले.



लोकसभा निवडणुकीच्यानिमित्ताने बैलहोंगल येथे आयोजित खुल्या प्रचारसभेला संबोधित करताना जगदीश शेट्टर पुढे म्हणाले, आपल्या भारत देशाची गेल्या १० वर्षांपूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती यात मोठा फरक आहे. यूपीए सरकारच्या काळात अनेक घोटाळे झाले आणि कोणताही विकास झाला नाही, मात्र नरेंद्र मोदींच्या गेल्या १० वर्षांच्या राजवटीत देशाने खूप विकास केला आहे. मोदींच्या प्रशासनाची शिस्त संपूर्ण जगासाठी आदर्श आहे. त्यामुळे परदेशातील नेते भारत देशाकडे आदराने बघत आहेत. या निवडणुकीत ४०० हून अधिक खासदार निवडून आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • विरोधकांच्या टिकेला उत्तर 

मी स्थानिक नसल्याचे सांगून माझा पत्ता विचारणाऱ्यांनी अगोदर स्वतःचा पत्ता द्यावा, मी मूळचा बेळगावचा आहे. तसेच १० वर्षे विरोधी पक्षनेता, जिल्हा पालकमंत्री म्हणून काम केले आहे असा टोला त्यांनी विरोधी गटाला लगावला. 

याप्रसंगी माजी आमदार डॉ. विश्वनाथ पाटील व जगदीश मेट्टगुड म्हणाले,नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्वांनी तळागाळातून काम करूया आणि बैलहोंगल विधानसभा मतदारसंघातून जगदीश शेट्टर यांना मोठे बहुमत मिळवून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न  करूया, असे आवाहन त्यांनी  केले. 

तर जेडीएसचे जिल्हाध्यक्ष शंकर मुडलगी म्हणाले, लोक काँग्रेसला कंटाळले आहेत. पाच हमीभाव योजनांच्या नावाखाली सत्तेवर आलेले सिद्धरामय्या  शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष का करत आहेत? असा  प्रश्न उपस्थित करून देशाला एक चांगला पंतप्रधान मिळाला हा आपला अभिमान आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन त्यांना तिसऱ्यांदा सत्तेत आणूया, असे ते म्हणाले.

यावेळी माजी आमदार संजय पाटील, ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, खासदार मंगला अंगडी, नारायण भडांगे, विजय मेटगुड्ड, गुरु मेटगुड्ड, सुनिल मुरकुंबी आदि नेते व्यासपीठावर होते.मंडळाचे अध्यक्ष गुरुपद काखी यांनी स्वागत केले व आभारही मानले.