- गुलाबपुष्प वितरित करून जि. पं. सीईओंकडून जनतेला मतदानाचे आवाहन
बेळगाव / प्रतिनिधी
जिल्हा स्वीप समितीने मंगळवारी बेळगाव शहरात निवडणूक जनजागृती पदयात्रेचे आयोजन केले होते. या जनजागृती कार्यक्रमात जिल्हा स्वीप समितीचे अध्यक्ष आणि जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी आधिकारी राहुल शिंदे यांनी सहभाग घेतला. यावेळी जनतेला गुलाबपुष्प देऊन त्यांनी सक्तीने मतदान करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत सर्व मतदारांनी सक्तीने मतदान करून मतदानाचे प्रमाण शंभर टक्के वाढवण्यासाठी योगदान दिले पाहिजे, अशी विनंती त्यांनी केली.
स्वीप समितीच्या माध्यमातून मतदारांमध्ये मतदान जागृती करण्यात येत आहे. यानिमित्ताने संगोळी रायण्णा बीएड महाविद्यालयीन प्रशिक्षणार्थींच्या सहकार्याने शहरातील किल्ला दुर्गादेवी मंदिरापासून या जनजागृती पदयात्रेला सुरुवात झाली. यानंतर मध्यवर्ती बसस्थानक, खडेबाजार,शनिवार खुट, काकतीवेस रोडमार्गे चन्नम्मा सर्कल येथे पदयात्रेची सांगता झाली. येथे प्रशिक्षणार्थींनी मानवी साखळी तयार करून सक्तीने मतदान करण्याबाबत जागृती केली.
पदयात्रेवेळी संगोळी रायण्णा बीएड महाविद्यालयाच्या सुमारे २०० प्रषिक्षणार्थींसह जिल्हा स्वीप समितीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मतदारांना गुलाबपुष्प वितरित करण्यासह फलकांद्वारे आणि पत्रके वाटून जनजागृती केली.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, जिल्हा नियोजन संचालक तथा जिल्हा स्वीप नोडल अधिकारी डॉ.एम.कृष्णराजू, मुख्य नियोजन अधिकारी गंगाधर दिवतर, जिल्हा निवडणूक खर्च नोडल अधिकारी शंकरानंद बनशंकरी,लेखापाल गंगा हिरेमठ, जिल्हा आयईसी समन्वयक प्रमोद गोडेकर, संगोळी रायण्णा बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य बी.जी. धारवाड, सहाय्यक व्याख्याते एन.एस.जाधव, जी.आर.कॉटेन आदी उपस्थित होते.
0 Comments