• कोथिंबीर वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला ट्रकची धडक  
  •  अपघातात ट्रॅक्टरचे तुकडे 

बेळगाव / प्रतिनिधी 

शेतातील कोथंबीर मार्केटला घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कॅन्टरने जोराची धडक दिल्याने दिलेल्या अपघातात ट्रॅक्टरचालक शेतकरी जागीच ठार झाला. आज रविवारी पहाटे ५.३० वा. दरम्यान पुणे - बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर हलगा येथे ही घटना घडली आहे.

मल्लाप्पा पारीस दंडकल्लणावर (वय वर्ष ४१ रा.बस्तवाड हलगा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मात्र या घटनेत कॅन्टर चालक बचावला आहे.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बस्तवाड (हलगा) येथून कोथिंबीर भरलेले ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन रविवारी पहाटे ५.३० वा. सुमारास बेळगाव भाजी मार्केटकडे जात असताना हलगा येथे हायवेवर पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका कॅन्टरची धडक बसून ट्रॉली एका बाजूला तर ट्रॅक्टर जवळजवळ ६०० ते ७०० फूट फरफटत गेला होता.

ही धडक इतकी जोराची होती की ट्रॅक्टरचे तुकडे होऊन जवळपास २५ फूट उंचावरून सर्विस रोडच्या खाली ट्रॅक्टरचे अवशेष पडले होते.सकाळच्यावेळी सर्विस रस्त्यावरून कोणाचीही ये - जा नसल्यामुळे सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही.मात्र हा भीषण अपघात जीवाचा  थरकाप उडवणारा होता. 

अपघातानंतर घटनास्थळी लोकांची गर्दी झाली होती. अपघातामुळे सकाळीच राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.दरम्यान घटनेची माहिती मिळताच हिरबागेवाडी पोलिस स्थानकाचे  निरीक्षक,  महामार्ग गस्तीपथकाची गाडी दहा मिनिटात घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी लागलीच क्रेन बोलवून हायवे वर पडलेले ट्रॅक्टरचे छोटे भाग व मृत ट्रॅक्टर चालकाच्या शरीराचे तुकडे बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.