खानापूर / प्रतिनिधी
काही दिवसांपासून बेळगाव आणि कारवार लोकसभा मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीने निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यातून होत होती. यासाठी कारवार लोकसभा मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे निरंजन सरदेसाई यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून निवडणुकीच्या माध्यमातून समितीला पुन्हा नव्याने बळ मिळणार आहे.
रविवारी खानापुर येथील शिवस्मारक येथे तालुका समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी गोपाळराव देसाई होते. यावेळी उमेदवारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच लोकसभेच्या माध्यमातून मराठी भाषिकांची ताकद दाखवून देण्याचा निर्धार करण्यात आला. प्रारंभी सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी प्रास्तविक केले.
लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या रणजीत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत निरंजन सरदेसाई यांना जाहिर पाठिंबा व्यक्त केला.
यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य पांडुरंग सावंत, गोपाळ पाटील, ऍड. अरुण सरदेसाई, रमेश धबाले, रामचंद्र गावकर यांच्यासह समिती कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments