बेळगाव / प्रतिनिधी 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असल्याने संशयास्पद बँक व्यवहार आणि डिजिटल पेमेंटवर लक्ष ठेवण्याची सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बँक अधिकाऱ्यांना दिली. याशिवाय मोठ्या रकमेचे तसेच संशयास्पद व्यवहार आढळल्यास तत्काळ माहिती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

शहरातील जुन्या जिल्हा पंचायत सभा भवनात शनिवारी (दि. ६) एप्रिल रोजी झालेल्या बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत आदर्श आचारसंहितेनुसार बँक व्यवहारांबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांची माहिती त्यांनी दिली. लोकसभा निवडणुकीत आमिष दाखवून मतदारांवर प्रभाव टाकण्याचे बेकायदेशीर प्रयत्न रोखण्यासाठी निवडणूक आयोग संशयास्पद बँक व्यवहार आणि डिजिटल पेमेंटवर कडक नजर ठेवत आहे.

सध्या जिल्ह्यातील केवळ ५ बँकांकडे संशयास्पद व्यवहारांची माहिती उपलब्ध आहे, उर्वरित बँकांकडून माहिती येणे बाकी आहे. अशा व्यवहारांची माहिती तातडीने सादर करावी, अशी सूचना त्यांनी बँक अधिकाऱ्यांनी केली.चेकपोस्टवर कागदपत्रांशिवाय ५० हजारांची रोकड आढळून आल्यास ती तात्काळ जप्त करून नियमानुसार कारवाई केली जाते. अनधिकृत रोकड हाताळणी रोखण्यासाठी सर्व चेक पोस्टवर कडक दक्षता घेण्यात आली आहे. १०० पेक्षा जास्त महिला बँक खातेदारांनी  ५००, १००० रुपयांचे पैसे ट्रान्सफर केले असतील तर अशी खाती गोठवली जावीत असे ते म्हणाले.

निवडणूक उमेदवारांची निवडणूक प्रचार मर्यादा ९५ लाख असेल. कोणत्याही कागदपत्रांशिवाय १० लाखांपेक्षा जास्त रक्कम बँकेत जमा करण्याची परवानगी नाही. असे खातेदार असल्यास, त्यांना योग्य ती कागदपत्रे प्राप्तिकर नोडल अधिकाऱ्यांकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या पाहिजेत. मोठ्या रकमेचे व्यवहार झाल्यास ताबडतोब आयकर नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे सांगून UPI डिजिटल पेमेंटद्वारे वेगवेगळ्या नंबरवरून पैसे ट्रान्सफर केले असतील तर माहिती द्यावी असे त्यांनी स्पष्ट केले. 

  • लाभार्थ्यांना कर्ज-सुविधा पुरविण्याच्या सूचना:

विविध शासकीय विभागीय योजनांद्वारे अर्ज सादर केल्यास अर्ज त्वरित निकाली काढण्यात यावेत. कर्ज सुविधेचे अर्ज कोणत्याही सबबीशिवाय फेटाळले जाणार नाहीत. उमेदवारांनी योग्य ती कागदपत्रे सादर केल्यास बँकेच्या अधिकाऱ्यांनी सक्तीने कर्ज उपलब्ध करून द्यावे, असेही ते म्हणाले.

या बैठकीत कृषी विभागाचे सहसंचालक व आदर्श आचारसंहिता नोडल अधिकारी शिवनगौडा पाटील, अथणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत कुलकर्णी, रोख विमोचन समितीचे सदस्य सचिव गौरीशंकर कडेचूर, स्थानिक लेखा परिमंडळाचे सहसंचालक शंकरानंद बनशंकरी, विविध बँकांचे प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.