बेळगाव / प्रतिनिधी 

राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे होरपळत आहे. मात्र, काँग्रेस सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भाजप प्रदेश रयत मोर्चाचे अध्यक्ष ए.एस.पाटील - नडहळ्ळी यांनी केला. 

बेळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना ए.एस.पाटील-नडहळ्ळी म्हणाले,  काँग्रेसची सत्ता येऊन नऊ महिने उलटले तरी विकासा कामे सुरू नाहीत. जिल्हा पालकमंत्रांच्या सूचनेप्रमाणे ग्रामपंचातीतील संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीचा अंदाज घेतला नाही. दुष्काळी परिस्थितीकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.

पुण्यात प्रतिलिटर दुधाला सात रुपये दर देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले होते.आजवर पूर्ण झालेले नाही. आता दुष्काळ असून ग्रामपंचायतीने गुरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शेतकरी विरोधी अर्थसंकल्प सादर केला आहे. शेतकऱ्यांना मदतीची योजना लागू झाली नाही.येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना किसान सन्मान योजनेंतर्गत दिलेली ४ हजारांची मदत थांबवण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना देण्यात येणारी शिष्यवृत्तीही बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारने शेतकऱ्यांसाठी एकही योजना केलेली नाही. राज्यात भीषण दुष्काळ आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ आपत्तीच्या वेळी मदत करते. मात्र सरकारने त्यांच्याकडे मदत मागितली नाही, असे ते म्हणाले. यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, बसवराज, इरय्या, कल्लाप्पाण्णा , गीता सुतार यांच्यासह भाजप रयत मोर्चाचे अनेक नेते सहभागी झाले होते.