• गीताज लव्हडेल नर्सरी स्कूलचे वार्षिक पारितोषिक वितरण - स्नेहसंमेलन उत्साहात 

बेळगाव / प्रतिनिधी 

बालपणामध्ये मुलांवर जसे संस्कार होतात, त्याचे परिणाम भविष्यात त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर दिसून येतात. मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ नये यासाठी लहानपणापासूनच पालकांनी मुलांवर सकारात्मक संस्कार करणे आवश्यक आहे, असे मत प्रा. तेजस कोलेकर यांनी व्यक्त केले. गीताज लव्हडेल नर्सरी स्कूल हनुमाननगर आणि सदाशिवनगर शाखेचे २८ स्नेहसंमेलन आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

प्रारंभी कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे प्रा. तेजस कोलेकर, प्राचार्य रवी भुते आणि त्यांच्या पत्नी सौ.दुर्गा भुते तसेच उपस्थित शिक्षक - पालक आणि विद्यार्थ्यांचे शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी अंजना हुबळीकर आणि श्रीमती शुभा यांनी प्रमुख पाहुणे प्रा.तेजस कोलेकर, प्राचार्य रवी भुते आणि दुर्गा भुते यांचे पुष्पगुच्छ आणि रोपटे देऊन स्वागत केले. तर राधिका शानभाग यांनी प्रमुख पाहुणे प्रा. तेजस कोलेकर यांचा परिचय करून दिला. 

प्रमुख पाहुणे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी अपूर्वा करिकट्टी यांनी स्वागतगीत सादर केले.

त्यानंतर हनुमाननगर व सदाशिवनगर स्कूलमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुणे प्रा.तेजस कोलेकर व प्राचार्य रवी भुते आणि दुर्गा भुते यांनी प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला.

याप्रसंगी दोन्ही स्कूलमधील विद्यार्थी - विद्यार्थिनींनी विविध कलात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. यामध्ये सुरुवातीला हनुमाननगर हिंडलगा शाखेच्या प्ले-ग्रुप आणि नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी रिमिक्स गाण्यांवर नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. तसेच सदाशिवनगर स्कूलच्या नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी रिल्स प्रकारावर आकर्षक नृत्य सादर केले. तर छोटा छोटा दिल...या गाण्याच्या बोलावर हिंडलगा शाखेच्या एलकेजी आणि युकेजीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य लक्षवेधी ठरले. यानंतर सदाशिवनगर स्कूलच्या एलकेजी आणि युकेजीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले भारतीय संस्कृतीवर आधारित नृत्य तसेच अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर सादर केलेल्या देखाव्याने उपस्थितांची मने जिंकली.

पालक, विद्यार्थी आणि शाळा यांच्यातील नाते दृढ व्हावे याकरिता गीताज लव्हडेल नर्सरी स्कूलतर्फे माता पालकांसाठी विविध स्पर्धा घेण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून गतवर्षी माता पालकांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्याचे पारितोषिक वितरण प्राचार्य दुर्गा भुते व व्यवस्थापिका अंजना हुबळीकर यांच्याहस्ते करण्यात आले.


याप्रसंगी पालकांच्यावतीने श्रुती कुलकर्णी यांनी गीताज लव्हडेल नर्सरी स्कूलच्या व्यवस्थापनाची प्रशंसा केली. विशेषतः कोरोना काळात शाळा भरूवून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत शिक्षण दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन राधिका शानभाग यांनी केले. तर सदाशिवनगर स्कूलच्या चार्वी कुलकर्णी या विद्यार्थिनीने आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.