•  बेळगावात दोन्ही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद 

बेळगाव / प्रतिनिधी 

भाजप आणि जेडीएसने आगामी लोकसभा निवडणुक एकत्रित लढण्याचे ठरवले असून दोन्ही पक्षांनी राज्यात युती केली आहे. यानिमित्ताने बेळगावात आज झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीचे उमेदवार जगदीश शेट्टर यांना विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला. सध्याच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करण्याची आम्हाला आशा आहे, असे सांगून दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाण्याचे मान्य केले.

यावेळी राज्यसभा सदस्य इराण्णा  काडाडी म्हणाले, राष्ट्रीय स्तरावर जेडीएस-भाजपचे नेते एकत्र आले आहेत आणि जिल्ह्यातील सर्व नेत्यांची एकजूट आहे. निवडणुकीपूर्वीच भाजप-जेडीएसची युती झाली आहे. आता निवडणुकीनंतर राज्यात आमची सत्ता आल्यास दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते दुग्धशर्करेप्रमाणे एकत्र काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

तर जिल्ह्यातील जेडीएसचे नेते शंकर माडलगी यांनी राज्यातील २८ पैकी २८ जागा जिंकण्याचे आमचे ध्येय असून देवेगौडा यांनी सांगितल्याप्रमाणे जगदीश शेट्टर यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी आम्ही काम करू, एकमेकांच्या कार्यकर्त्यांची साथ न सोडता एकत्र निवडणुकीला सामोरे जाऊ आणि  देशातील जनतेला चांगला संदेश देण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे ते म्हणाले. 

यानंतर भाजपचे उमेदवार तथा माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी देशाच्या सुरक्षेसाठी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी ते पुढे म्हणाले, देवेगौडा व  कुमारस्वामी नरेंद्र  मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी एनडीए आघाडीत सामील झाल्याने राज्यात बरेच बदल झाले आहेत. भाजपला २५ जागा आणि जेडीएसला ३ जागा देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाचा आर्थिक विकास करणारा देश बनला असून आता देशाला  तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचा मोदींचा निर्धार आहे. त्यामुळे अनेक पक्षांना एनडीएसोबत युती हवी होती आणि जेडीएस हा त्यापैकी एक होता, असे सांगताना आगामी निवडणुकीत काँग्रेसचे कुशासन संपवणे हे भाजप आणि जेडीएसचे लक्ष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

काँग्रेसकडे नेता नाही, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, मुख्यमंत्री डी.के.शिवकुमार, मल्लिकार्जुन खर्गे , राहुल गांधी यापैकी  कोणाचीही मोदींशी तुलना होऊ  शकत नाही. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणे हे आपले कर्तव्य आहे. तेव्हा बेळगावातून जगदीश शेट्टर अर्थात भाजपला मोठ्या फरकाने विजयी करून मोदींचे हात बळकट करण्यासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन शेट्टर यांनी केले. 

या पत्रकार परिषदेला राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, जेडीएसचे जिल्हाध्यक्ष शंकम माडलगी, विधानपरिषद सदस्य हनुमंत निराणी, ​​ॲड. एम.बी.जिरली, ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवठगीमठ, भाजपचे राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके आदि उपस्थित होते.