संकेश्वर : येथील चन्नम्मा सर्कलनजीक दुचाकीची ट्रॅक्टरला धडक बसून झालेल्या अपघातात शालेय विद्यार्थ्याचा  दुर्दैवी मृत्यू  झाला. आदर्शकुमार गुप्ता (वय १६ रा. संकेश्वर ; ता. हुक्केरी) असे मृताचे नाव असून तो संकेश्वर येथील एस. एस. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकत असल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार आदर्शकुमार आपल्या बहिणीला शाळेत सोडण्यासाठी गेला असता, भरधाव वेगात असलेल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकावर आदळली  आणि पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरला धडकली. ही धडक इतकी जोराची होती आदर्शकुमार याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच संकेश्वरचे पोलिस निरीक्षक शिवशरण आवुजी व कर्मचारी एम.एम.जंबगी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी नजीकच्या सरकारी रुग्णालयात पाठविला. या घटनेची नोंद संकेश्वर पोलिस स्थानकात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.