• भाजप पक्षश्रेष्ठींकडून जगदीश शेट्टर यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा 
  • जनतेमध्ये नाराजी ; स्थानिक व्यक्तीला उमेदवारी देण्याची मागणी

बेळगाव / प्रतिनिधी

राज्याचे राजकारण एकीकडे तर बेळगावचे राजकारण दुसरीकडे... विधानसभा निवडणूक असो किंवा लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे कधीच पहिल्या अथवा दुसऱ्या यादीत कोणत्याही पक्षातर्फे जाहीर करण्यात येत नाहीत. या निवडणुकीतही याची प्रचिती येत आहे. विशेषतः भाजपसाठी बेळगाव लोकसभा निवडणूक जिंकणे हे प्रतिष्ठेचे बनले आहे.

भाजपने आतापर्यंत उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या असून यामध्ये चिक्कोडी मतदारसंघासाठी  तेथील विद्यमान खासदारांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत अद्यापही सस्पेन्स कायम आहे.

वास्तविक बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचे अनेक प्रभावी नेते आहेत. परंतु पक्षश्रेष्ठींकडून बेळगाव जिल्ह्याबाहेरील उमेदवार अर्थात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू असल्यामुळे जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने उमेदवारी नाकारल्याने नाराज होऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या जगदीश शेट्टर यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळवली. मात्र भाजपमधील त्यांच्या शिष्यानेच त्यांचा पराभव केला होता.

त्यानंतर लोकसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून पुन्हा भाजपमध्ये घरवापसी केलेल्या शेट्टर यांना बेळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा विचार भाजप पक्षश्रेष्ठी करत आहेत. पण याचा भाजपला कितपत फायदा होईल याबाबत जनतेतून अनेक शंका उपस्थित होत आहेत.

भाजपकडून शेट्टर यांचे नाव जाहीर होण्यापूर्वीच स्थानिक भाजपचे नेते शेट्टर यांच्या विरोधात उभे असून "गो बॅक शेट्टर" अभियान राबवण्यात आले आहे. तर स्थानिक नेत्यांना उमेदवारी देण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठींसमोर बेळगावच्या उमेदवारीबाबत पेच निर्माण झाला आहे.

भाजपला सर्वाधिक मतदान करणारा बेळगाव तालुक्यातील मराठा समाजसुद्धा येथील मराठी भाषिक नेत्याला उमेदवारी द्या अशी मागणी करत आहे.

  • विधानसभा निवडणुकीत बेळगाव ग्रामीणमध्ये भाजपला फटका : नवख्या उमेदवारामुळे गमावली जागा 

गत २०२३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बेळगाव ग्रामीण मतदारसंघात अनेक मातब्बर नेत्यांना डावलून नवख्या व्यक्तीला उमेदवारी दिल्याने भाजपला ही जागा गमवावी लागली होती.

त्यामुळे आताही विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे. अन्यथा २०२३ च्या विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होईल अशी चर्चा जनमानसात सुरू आहे.

बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी पक्षश्रेष्ठींनी जगदीश शेट्टर यांच्या नावाला पसंती दर्शवल्याने इथे निश्चित हरणारा उमेदवार देऊन भाजपमध्ये पुन्हा काँग्रेसला मदत करण्याचे षडयंत्र रचले जात आहे असे सर्व सामान्य जनतेतून बोलले जात आहे.