- घटनेनंतर परिसरात खळबळ : दिवसभर रंगली चर्चा
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव तहसीललदार कार्यालयाच्या आवारातील एका झाडाला काळी बाहुली बांधल्याचा अंधश्रद्धेचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. त्यामुळे एकच खळबळ माजली. लहान मुलांच्या खेळण्यातील छोट्याटेडी सारख्या असलेल्या या बाहुलीच्या तोंडात दातांची कवळी बसवल्याचे दिसत होते. हे पाहून अनेकांना धक्काच बसला. यानंतर अमावस्या असल्याने कोणीतरी अंधश्रद्धेतून हा प्रकार केल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
बेळगावातील पूर्वीची रिसालदार गल्ली व आताच्या स्वामी विवेकानंद मार्गावर महापालिकेच्या जुन्या इमारतीत काही वर्षांपूर्वी बेळगाव तहसील कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या डाव्या बाजूने पार्किंगसाठी शेड घातले आहे. याठिकाणी पूर्वीपासूनच काही झाडे आहेत. त्यातील एका झाडाला सुमारे फूटभर लांबीची ही काळी बाहुली लटकविण्यात आली होती.
तहसीलदार कार्यालयाच्या तळमजल्यावरच बेळगाव वननेम्मदी केंद्र आहे. या केंद्रात बेळगाव शहरभरातील व उपनगरातील शेकडो लोक रोज आधारकार्ड दुरुस्ती, लाईटबील व अन्य करभरणा करण्यासाठी येत असतात. काळी बाहुली बांधल्याचा प्रकार पाहून त्यातील अनेकांना धक्काच बसला तर अनेकजण घाबरले तर काहींनी कोणीतरी हा खोडकरपणा केला असावा अशी शंकाही बोलून दाखवली.
मात्र महापालिका असताना आणि आता तहसीलदार कार्यालय सुरु झाल्यापासूनच या इमारतीच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ माजली. कार्यालय परिसरात याविषयी दिवसभर उलटसुलट चर्चा रंगली होती.
0 Comments