• भाजपचे अधिकृत उमेदवार तथा माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचे जनतेला आश्वासन
  • माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पाही यांच्या उपस्थितीत बेळगावात प्रचारफेरी

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव ही माझी जन्मभूमी आहे, येथून निवडून आल्यानंतर विकासासाठी रात्रंदिवस काम करण्याचे आश्वासन माजी मुख्यमंत्री तथा बेळगाव मतदार संघातील भाजपचे अधिकृत उमेदवार जगदीश शेट्टर यांनी दिले. आज बेळगाव येथे झालेल्या प्रचारफेरीवेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा उपस्थित होते. 

तत्पूर्वी बुधवारी सकाळी जगदीश शेट्टर हिरेबागेवाडी टोलनाक्यावरून बेळगावात दाखल झाले. नंतर किल्ला दुर्गादेवी मंदिरात पूजा करून बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली. भाजप पक्षाचे चिन्ह, पक्षाची शाल आणि झेंडा घेतलेले कार्यकर्ते भगवे फेटे परिधान करून रॅलीत सहभागी झाले होते. रॅली दरम्यान  भाजप कार्यकर्त्यांनी अब की बार मोदी सरकार, अब की बार चारसो पार, हर घर मोदी, घर घर मोदी, भारतमाता की जय, हमारा नेता कैसा हो , नरेंद्र मोदी जैसा हो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, राणी चन्नम्मा की जय, अशा जोरदार घोषणा दिल्या. 

खुल्या जीपमध्ये भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर, बी. एस. येडियुरप्पा उभे राहून मतदारांना अभिवादन करत होते. अशोक चौकातून संगोळी रायण्णा चौक मार्गे न्यायालयात आल्यानंतर जगदीश शेट्टर यांनी न्यायालयाच्या आवारातील क्रांतिकारक संगोळी रायण्णा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. चन्नम्मा चौकात आल्यानंतर राणीने चन्नम्मा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर राणी चन्नमा सर्कल येथील गणपती मंदिरात आरती करण्यात आली. 

त्यानंतर कॉलेजरोड ते धर्मवीर संभाजी चौकापर्यंत पदयात्रा काढून धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, कपिलेश्वर मंदिरमार्गे शिवाजी पार्कमार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर गोवावेस महात्मा फुले मार्गालगत जगतज्योती  बसवेश्वरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सदाशिवनगर येथील भाजप महानगर कार्यालयाजवळ बाईक रॅलीचा समारोप करण्यात आला.

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणाले, लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्याचे आमचे ध्येय आहे.त्यासाठी बेळगाव लोकसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचे नाव पक्षश्रेष्ठींनी सुचवले आहे. त्यांचा विजय निश्चित आहे. ते किमान दोन लाख मतांच्या फरकाने विजयी होतील, यात शंका नाही. पण आपण उदासीन राहू शकत नाही. त्यांनी सर्वांना त्यांच्या विजयासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या रॅलीत भाजप नेते एन. रविकुमार, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील, महानगर जिल्हाध्यक्षा गीता सुतार, सरचिटणीस मुरुगेंद्रगौडा पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, माजी उपमहापौर रेश्मा पाटील , नगरसेवक जयतीर्थ जोशी, राजशेखर डोणी, शरद पाटील, शिल्पा केकरे, गीता कोळी यांच्यासह भाजपच्या विविध शाखांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.