मुंबई : अभिनेता गोविंदा अहुजा याने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला असून गोविंदाला मुंबईतील वायव्य मुंबईतून उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा आहेत. ठाकरे गटाकडून या जागेवर अमोल किर्तीकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
बुधवारी रात्री अभिनेता गोविंदाने माजी आमदार आणि शिंदे कृष्णा हेगडे यांची भेट घेतली होती. गोविंदा शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत. गोविंदाला राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची इच्छा असल्याची कृष्णा हेगडे यांनी सांगितले होते. वायव्य मुंबई लोकसभा जागेसाठी गोविंदाच्या रूपात शिवसेनेकडून नवीन चेहरा उतरवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
शिंदे गटात गेल्यानंतर गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. गेल्या १४ वर्षांच्या वनवासानंतर आता पुन्हा राजकारणात प्रवेश करतोय असे तो म्हणाला.
गोविंदा काय म्हणाला?
जय महाराष्ट्र. मी शिंदे साहेबांचे आभार मानतो आणि शुभेच्छा स्वीकारतो. आजच्या दिवशी या पक्षात प्रवेश करतोय. ही माझ्यासाठी देवाने दिलेली प्रेरणा आहे.
मी २०१९ ला राजकारणातून बाहेर पडल्यावर वाटले नव्हते पुन्हा या क्षेत्रात येईन. पण वनवासानंतर मी पुन्हा रामराज्य असलेल्या पक्षात येत आहे. मी मला दिलेली जबादारी इमानदारीने पार पाडेन. गेले १४-१५ वर्ष मी मला आई बाबांनी शिकवलेला मंत्र म्हणत होतो आणि अभिनय करत होतो. मी कला आणि सांस्कृतिक विभागात चांगले कार्य करीन. ही जन्मभूमी संताची आहे. या भूमीत सगळे आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईचे सुशोभीकरण वाढले, कामांना गती मिळाली, प्रदूषण कमी होत आहे. आता मुंबई फार सुंदर दिसत आहे. मुंबईत शिंदे साहेबांमुळे बदल झाला आहे. माझ्यावर शिवकृपा राहिली. बाळासाहेब यांची देखील आमच्या कृपा होती. मुंबईतील फिल्म सिटी जगातली सगळ्यात भारी फिल्म सिटी करणार. लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय मुख्यमंत्री घेतील.
नवीन चेहऱ्याला पसंती :
वयाच्या कारणास्तव शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर हे निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा असल्याने एकनाथ शिंदे या ठिकाणी नव्या चेहऱ्याच्या शोधात होते. त्यासाठी अक्षय कुमार, माधुरी दीक्षित आणि नाना पाटेकर यांच्या नावाची चर्चा सुरू होती. नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित यांनी राजकारणात यायला नकार दिला होता. पण आता गोविंदाच्या रुपात त्यांना उमेदवार मिळाला असून ठाकरेंच्या अमोल किर्तीकर यांना तगडी लढत मिळणार असल्याचे दिसत आहे.
गोविंदाला राजकारणाचा अनुभव :
अभिनेता गोविंदा याने २००४ साली उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी भाजपच्या राम नाईकांचा पराभव केला होता. गोविंदाची प्रसिद्धी लक्षात घेता त्याला तिकीट देऊन काँग्रेसने भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला होता. नंतरच्या काळात गोविंदाने राजकारणाला रामराम करत पुन्हा एकदा अभिनयाकडे मोर्चा वळवला. पण आता पुन्हा एकदा त्याने राजकारणात प्रवेश केला आहे.
अमोल किर्तीकरांना तगडी फाईट देणार :
अमोल किर्तीकरांच्या रुपात उद्धव ठाकरे यांनी वायव्य मुंबईतून तगडा उमेदवार दिला आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे हे नवीन आणि लोकप्रिय चेहऱ्याच्या शोधात होते. त्यामुळे गोविंदाला त्यांनी पक्षात घेतल्याची माहिती आहे. आता गोविंदा हा अमोल किर्तीकरांचे आव्हान कसे पेलणार हे पाहावे लागेल.
0 Comments