- नूतन शहर पोलिस आयुक्त इडा मार्टिन
बेळगाव / प्रतिनिधी
शहर पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी चांगले प्रशासन देत आहेत. पोलिस प्रशासनाची यंत्रणा खालच्या स्तरावरही सुधारली पाहिजे, असे मत नूतन शहर पोलिस आयुक्त इडा मार्टिन यांनी व्यक्त केले.
मंगळवारी पोलिस आयुक्त कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बेळगावची माहिती घेतली. हिवाळी अधिवेशनात मला येथे काम करण्याचा अनुभव आहे. प्रशासकीयदृष्ट्या शहर पोलिस विभागात सुधारणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच वाहतूक समस्या सोडविण्यासाठी जनतेचे सहकार्यही आवश्यक आहे. गुन्हेगारी प्रकरणांना आळा घालण्यासाठी पोलीस विभाग वेगाने काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सोमवारी मी शहर पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. आमच्या कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. दोन्ही डीसीपींनी बेळगाव शहरात चांगले काम केल्याचे जाणवते. आपल्या बाजूने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व नागरिकांनी पोलिसांना सहकार्य केले तरच शहर शांत राहू शकेल, असे ते म्हणाले.
सार्वजनिक समस्या सोडविण्यास दिरंगाई करून चुका करणाऱ्या अधिकाऱ्यांवर न डगमगता कारवाई केली जाईल. वाहतूक समस्येबाबत आपण वाहतूक डीसीपींसोबत बैठक घेतली असून, लवकरात लवकर समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पत्रकार परिषदेला पोलिस उपायुक्त रोहन जगदीश, सहाय्यक पोलिस आयुक्त सदाशिव कट्टीमणी उपस्थित होते.
0 Comments