• लोटांगणसह जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा 
  • जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले  निवेदन 

बेळगाव / प्रतिनिधी  

शेतकऱ्यांच्या सुपीक शेत जमिनीत  हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरू केल्याच्या विरोधात नेगील योगी रयत संघाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आज बेळगावात  निदर्शनांसह जोरदार आंदोलन करून शेतकऱ्यांचा विरोध न जुमानता सुरू असलेले हलगा-मच्छे बायपासचे काम तात्काळ थांबवण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

यावेळी बायपास रस्त्याचे काम हाती घेतलेल्या प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सरकारच्या विरोधात घोषणा देण्यासह जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, देणार नाही देणार नाही आमची जमीन देणार नाही, बोलो भारत माता की जय, जय जवान जय किसान, नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी अशा घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी दडपशाही करत हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला.

यावेळी हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधात शेतकरी नेते राजू मर्वे रमाकांत कोंडुसकर आदींच्या नेतृत्वाखाली बहुसंख्य स्त्री-पुरुष शेतकऱ्यांनी चन्नम्मा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लोटांगणे घालण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसांच्या आडमुठेपणामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून.जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यामार्फत शासनाला निवेदन सादर करून बेळगावचा झिरो पॉईंट निश्चित करूनच हलगा- मच्छे बायपासचे काम केले जावे आणि सध्या सुरू असलेले या रस्त्याचे काम तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

'रद्द करा रद्द करा हलगा मच्छे बायपास रस्ता रद्द करा' या मागणीचे बॅनर हातात घेऊन हलगा, जुने बेळगाव, माधवपूर वडगाव, अनगोळ, मजगाव, येळळूर, मच्छे येथील बहुसंख्य शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनीही शेतकऱ्यांना पाठिंबा देत या आंदोलनात सहभाग घेतला. नेमकी हीच बाब झोंबलेल्या  पोलिसांनी रमाकांत कोंडुसकर यांना आंदोलना दरम्यान  कायदा सुव्यवस्थेचे कारण पुढे करून पोलीस व्हॅनमध्ये डांबण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रमाकांत कोंडुसकर आणि संबंधित पोलीस अधिकारी यांच्यात शाब्दिक वाद झाला. पोलिस कोंडुसकर यांना मज्जाव करत असल्याचे पाहून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या दडपशाहीला जोरदार विरोध केला. आम्ही न्यायासाठी लोकशाहीच्या मार्गाने शांततेत आंदोलन करत आहोत, तुम्ही आम्हाला अडवू शकत  असे आंदोलकांनी पोलिसांना खडसावले, त्यामुळे पोलिसांनी अखेर माघार घेतली.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नेगील योगी रयत संघाचे रवी पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीमध्ये बेकायदेशीररित्या हलगा - मच्छे बायपासचे काम सुरू आहे. शेतकरी गरीब आहेत ज्यांच्याकडे केवळ एक एकर जमीन आहे. अशी जमीनही बेकायदेशीरपणे संपादित करण्याचा प्रयत्न अधिकारी करत आहेत. असे असताना शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्याय विरोधात लढण्यासाठी कोणीही राजकारणी पुढे येत नाही. राज्य सरकार देखील बोले तैसा चाले याप्रमाणे वागत नाही. अशाप्रकारे खोटे बोलल्यानेच राज्यात सर्वत्र महागाई वाढली आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी शेतकरी नेते राजू मर्वे म्हणाले, केंद्रसह राज्य सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. बेळगावच्या ९ गावातील शेतकरी २०१९ पासून हलगा - मच्छे   बायपास रस्त्याच्या कामाला विरोध करत आहेत. न्यायालयाचा आदेश डावलून जबरदस्तीने हलगा- मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरू करून शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. तेव्हा बेळगावचा झिरो पॉईंट निश्चित झाल्याशिवाय सदर रस्त्याच्या कामाला परवानगी देऊ नये. शिवाय सध्या सुरू असलेले रस्त्याचे काम तात्काळ बंद करण्यात यावे अशी शेतकऱ्यांची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

हलगा - मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधातील आजच्या शेतकरी आंदोलनामध्ये महाराष्ट्र समितीचे रणजीत चव्हाण - पाटील, दत्ता जाधव आणि पदाधिकारी यांच्यासह स्त्री-पुरुष शेतकरी सहभागी झाले होते.