- आरसीबीच्या नशिबी चेपॉकवर पुन्हा पराभव
चेन्नई : आयपीएल २०२४ च्या पर्वाची सुरुवात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वातील चेन्नई सुपर किंग्ज आणि फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्त्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु यांच्यातील लढतीने झाली. या लढतीत पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या आरसीबीने २० ओव्हर्समध्ये ६ बाद १७३ धावा केल्या होत्या. आरसीबीने दिलेले १७४ धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्सने शिवम दुबेच्या इम्पॅक्ट पाडणाऱ्या तुफान खेळीसह पहिल्याच सामन्यात ६ विकेट्सने मोठा विजय नोंदवला आहे. १९ व्या षटकात २ चौकार आणि एका षटकारासह शिवम दुबेने चेन्नईला सहज विजय मिळवून दिला. मुस्तफिझूर रहमान हा चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने गोलंदाजी करताना ४ विकेट्स घेत आरसीबीच्या फलंदाजांना वेसण घातले.
चेन्नईच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली पण त्यांनी ठराविक अंतराने विकेट गमावल्या. प्रत्येक खेळाडूने फलंदाजी करत संघाच्या धावांमध्ये आपले योगदान दिले. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या शिवम दुबेने पुन्हा एकदा प्रभावी फलंदाजी केली. तर जडेजाने त्याला साथ देत काही मोठे फटके खेळले. १८ चेंडूत १८ धावा असा अटीतटीचा सामना सुरू असताना शिवम दुबेने दोन चौकार लगावत चेन्नईला विजयाच्या अधिक जवळ आणले.
चेन्नईकडून मिळालेल्या १७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नवा कर्णधार ऋतुराज गायकवाडने सिराजच्या गोलंदाजीवर चौकार मारत दणदणीत सुरूवात केली. ऋतुराजसोबत सलामीसाठी रचिन रवींद्र आला. झटपट धावा करणारा ऋतुराज १५ धावा करत झेलबाद झाला. त्याच्यानंतर रचिनने शानदार फटके खेळत संघाचा डाव पुढे नेला.पण कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर तो ३ षटकार आणि ३ चौकारांसह ३७ धावा करत बाद झाला. यानंतर डॅरिल मिचेल (२७) आणि अजिंक्य रहाणे (२२) जबरदस्त फलंदाजी करत होते पण फार काळ मैदानात टिकू शकले नाहीत. शिवम दुबेला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीसाठी उतरला. तर त्याच्यासोबत जडेजा संघाचा डाव सावरत होता.
तत्त्पूर्वी आरसीबी संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सीएसकेचा नवा गोलंदाज मुस्ताफिझूर रहमान गोलंदाजीला येईपर्यंत बंगळुरू संघाचा हा निर्णय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला. सलामीसाठी आलेल्या फॅफ डू प्लेसिसने संघाला जबरदस्त सुरूवात करून दिली. त्याने २३ धावांत ८ चौकार मारत ३५ धावा केल्या. पाचव्या षटकात मात्र आरसीबीच्या हातून सामना निसटत असल्याचे दिसले. मुस्तफिझूरच्या षटकात फॅफ (३५) आणि रजत पाटीदार (०) झेलबद झाले. पुढच्याच षटकात चहरने मॅक्सवेलला खाते न उघडताच धोनीकडून झेलबाद केले.
या मोठ्या धक्क्यांनंतर विराट कोहली (२१) आणि कॅमेरून ग्रीन (१८) हे दोघे संघाचा डाव सावरत होते.पण मुस्तफिझूरने त्यांना बराच काळ मैदानात टिकू दिले नाही. १२व्या षटकात विराटला झेलबाद करताना रचिन आणि रहाणेने अफलातून झेल टिपला. तर त्याच षटकात चौथ्या चेंडूवर ग्रीनला क्लीन बोल्ड केले. या विकेटनंतर आरसीबी संघ पूर्णपणे कोलमडला असे वाटले, पण नंतर आलेल्या दिनेश कार्तिक आणि अनुज रावत यांनी ५ बाद ७९ धावांपासून १७३ धावसंख्येपर्यंत पोहोचवला.
अनुज रावतने सामन्याचा रोख बदलत २५ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटाकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या. पहिला डाव संपल्याने त्याचे अर्धशतक हुकले पण संघासाठी निर्णायक क्षणी महत्त्वाची इनिंग तो खेळला. तर दिनेश कार्तिकसुध्दा मोक्याच्या वेळी पुन्हा एकदा संघासाठी संकटमोचक ठरला, त्याने २६ चेंडूक २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ३८ धावा केल्या.
0 Comments