• मस्तीहोळीतील शेतकऱ्यांचे बेळगावात तीव्र आंदोलन  
  • जनावरे घेऊन पाटबंधारे कार्यालयात निदर्शने 
  • पाटबंधारे विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या निलंबनाची केली मागणी 
  • स्थापत्य मुख्य अभियंता बी.आर.राठोड यांच्या कार्यालयाला घातला घेराव 

बेळगाव / प्रतिनिधी 

हिडकल धरणाच्या बॅक वॉटरमुळे जमिनी गमावलेल्या बेळगाव जिल्ह्याच्या हुक्केरी तालुक्यातील मस्तीहोळी येथील शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाकडून नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी येथील मस्तीहोळी गावातील शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी बेळगाव येतील पाटबंधारे विभाग कार्यालयाला घेराव घातला.

तत्पूर्वी मस्तीहोळी गावातील शेकडो शेतकरी चन्नम्मा सर्कल येथे जमले आणि त्यांनी २ तास ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर  शेतकऱ्यांनी तेथून मोर्चा काढून पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर मुख्य अभियंता बी.आर.राठोड यांनी कार्यालयाला घेराव घातला. तसेच भ्रष्ट अधिकारी स्वस्त इंजिनीअर बी.आर. राठोड, सीएओ औद्राम, निरावरी निगमचे एम. डी. राजेश , अमिनबावी, रवींद्र तलूर, एस. एम. माडीवाले, एस. आर. कामथा यांना लवकरात लवकर निलंबित करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती.

  • पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात गुरे घेऊन शेतकरी दाखल : 

उन्हाची पर्वा न करता गुरे घेऊन पायी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला घेराव घालणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली गुरे सोबत घेऊन आवारात बांधून त्यांना चारा घेतला आणि रांगेत बसून अधिकाऱ्यांच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पाटबंधारे कार्यालयासमोरील वाहतूक दीर्घकाळ विस्कळीत झाली होती. तेव्हा तेथे कार्यरत असलेल्या पोलिसांनी अवजड वाहनांना सूचना करून वाहतूक सुरळीत केली. 

याप्रसंगी आंदोलनकर्त्या  शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागातील पाच भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत न्याय देण्याची मागणी केली. यावेळी  सोबत आणलेले अन्नधान्य उघडून, भाजीपाला स्वच्छ करत, स्टोव्हवर जेवण बनवून शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन केले. 

यावेळी शेतकरी नेते बाळेश मावनुरी म्हणाले की, बेळगावी जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील मस्तीहोळी व गुडनट्टी बीरहोळी गावातील शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलने करूनही पाटबंधारे विभागाने नुकसान भरपाई दिली नाही. हायकोर्टाने दोन वर्षांपूर्वी ३९६ एकर जमिनीची भरपाई देण्याचे आदेश दिले असतानाही नुकसान भरपाई देण्यात आली नसल्याचा निषेध करत हिडकल धरण कर्नाटक पाटबंधारे महामंडळाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध  आंदोलन केले. १९८० मध्ये हिडकल धरणाच्या बॅक वॉटरमुळे जमिनी गमावलेल्या हुक्केरी तालुक्यातील मस्तीहोळी गावातील कुटुंबांना तब्बल ४४ वर्षांनंतर भरपाई देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या आश्वासनावरून हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी मंत्र्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आहे. हे योग्य नसल्याची टीका त्यांनी केली .

  • मंत्र्यांचे नाव कलंकित करण्याचा अधिकाऱ्यांचा प्रयत्न : 

हिडकल  धरणाच्या पाण्यामुळे जमीनदोस्त झालेल्या मस्तीहोळी  येथील शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करणारे निवेदन आम्ही जिल्हाधिकारी व मंत्र्यांना दिले आहे. मात्र पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मूळ आदेशाचे बनावट दस्तऐवज तयार केले असून  मंत्र्यांचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेस सरकार आणि मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याबद्दल आम्हाला शंका नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने आम्हाला खूप मदत केली आहे. या भ्रष्ट पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या विरोधात आमचे आंदोलन असल्याचा आरोप त्यांनी केला.

  • कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास थेट अधिकारी जबाबदार : 

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही आज चोवीस तास बेमुदत उपोषण करणार आहोत. या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकरी व महिलांना काही अडचणी आल्यास त्याला थेट पाटबंधारे विभागातील अधिकारी जबाबदार असून, आम्हाला न्याय मिळेपर्यंत या ठिकाणाहून हलणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

कोणी आले आणि आश्वासन दिले तरी आम्ही डगमगणार नाही. पाटबंधारे विभागाने हुक्केरी तालुक्यातील हिडकल धरणाच्या बॅक वॉटरमुळे ज्या शेतकऱ्यांची जमीन गेली त्यांना नुकसान भरपाई द्यावी. शेतकऱ्यांचे सतत हाल करणाऱ्या भ्रष्ट सिंचनाच्या पाच अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली.

  • आंदोलनस्थळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट :  

हिडकल धरणाच्या बॅकवॉटरमध्ये जमीन गमावलेल्या मस्तीहोळी येथील शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाकडून नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी  पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोरील शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दुपारी ४ वा. भेट दिली. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि शेतकऱ्यांशी योग्य नुकसान भरपाई देण्याबाबाबत त्यांनी चर्चा केली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या समस्यांवर त्वरित तोडगा काढण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मात्र जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही कोणत्याही कारणास्तव या ठिकाणाहून हटणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. 

या आंदोलनात मस्तीहोळी, गुडनट्टी, बिरहोळी गावातील शेतकऱ्यांमधून शेकडो शेतकरी व महिला सहभागी झाल्या होत्या.