• सॅम करन ठरला विजयाचा शिल्पकार

चंदिगड : आयपीएल २०२४ मधील दुसरा सामना शनिवारी महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, चंदिगड येथे पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज आमनेसामने आले होते. ज्यामध्ये पंजाब किंग्जने सॅम करनच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सवर ४ विकेट्सनी मात करत आपला पहिला विजय नोंदवला. तत्पूर्वी दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना अभिषेक पोरेलच्या वादळी खेळीच्या जोरावर ९ बाद १७४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने १९.२ षटकांत ६ गडी गमावून विजय मिळवला.

सॅम करन ठरला विजयाचा शिल्पकार : 

कर्णधार शिखर धवनने १७५ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पंजाब किंग्जला वेगवान सुरुवात करून दिली. त्याने १६ चेंडूत २२ धावा केल्या, मात्र जॉनी बेअरस्टो ३ चेंडूत ९ धावा करून धावबाद झाला. मधल्या षटकांमध्ये पंजाबची धावगती खूपच कमी राहिली आणि वेळोवेळी विकेट पडत राहिल्या. यानंतर प्रभसिमरन सिंगने १७ चेंडूत २६ धावा केल्या, पण सॅम करनच्या शानदार अर्धशतकाच्या खेळीने पंजाब किंग्जला विजयापर्यंत नेले. त्याने ४७ चेंडूत ६३ धावांची खेळी खेळली. दरम्यान, खलील अहमदने १९ व्या षटकात सलग २ विकेट्स घेत सामना रोमांचक बनवला होता. मात्र लियाम लिव्हिंगस्टोनने २१ चेंडूत ३८ धावांची खेळी करताना षटकार मारुन पंजाब किंग्जला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी नाणेफेक हारून प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्लीची सुरुवात अतिशय वेगवान झाली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी पहिल्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी केली. चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अर्शदीप सिंगने मार्शची विकेट घेतली. त्याने १२ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २० धावा केल्या. ७४ धावांवर दिल्लीला दुसरा धक्का बसला. धोकादायक दिसणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला हर्षल पटेलने आपला बळी बनवला. वॉर्नरने २१ चेंडूत २९ धावांची खेळी खेळली.

यानंतर शाई होपने २५ चेंडूत ३२ धावांची खेळी खेळली. सुमारे १५ महिन्यांनंतर पुनरागमन करणारा दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत मोठी खेळी खेळू शकला नाही आणि त्याने १३ चेंडूत १८ धावा केल्या. रिकी भुईने ७ चेंडूत केवळ ३ धावा केल्या. अशा प्रकारेदिल्लीने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. यानंतर प्रभावशाली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या अभिषेक पोरेलने फलंदाजीत महत्त्वाचे योगदान दिले.

शेवटच्या षटकात २५ धावा :

पंजाबसाठी शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या हर्षल पटेलच्या षटकात चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. अभिषेकने शेवटच्या षटकात २५ धावा केल्या. यादरम्यान त्याने ३ चौकार आणि २ शानदार षटकार मारले. ज्यामुळे दिल्लीला ९ बाद १७४ धावा करता आल्या. ज्यामध्ये अभिषेक पोरेलने १० चेंडूत नाबाद ३२ धावांचे योगदान दिले. पंजाब किंग्जकडून हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंगने २-२ विकेट्स घेतल्या. त्यांच्याशिवाय कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार आणि राहुल चहर यांनी १-१ विकेट घेतली.