बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही सर्व एकसंघ आहोत. माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या उपस्थितीने सर्व मतभेद दूर झाले आहेत. यंदा पुन्हा बेळगाव मतदारसंघातून भाजप उमेदवाराला निवडून देत. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्याचे आवाहन बेळगाव भाजप लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार जगदीश शेट्टर यांनी केले. आज बेळगाव शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बेळगाव ही माझी कर्मभूमी असून बेळगावच्या विकासासाठी मी योगदान दिलेले आहे. विरोधी नेते मी बाहेरून आल्याचा अपप्रचार करीत आहेत. याआधी बेळगाव जिल्हा पालकमंत्री म्हणून मी बेळगावचा विकास साधला आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या उपस्थितीत बेळगाव भाजपमधील मतभेद आता दूर झाले आहेत. ज्यानुसार दिवंगत सुरेश अंगडी आणि त्यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना पाठिंबा दिला होता त्या प्रकारे आपल्यालाही पाठिंबा देऊन यंदा पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी आपल्याला आशीर्वाद देण्याचे आवाहन केले.
यावेळी त्यांनी काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली. गोहत्या कायदा, धर्मांतर कायदा रद्द करण्याची घोषणा केलेल्या काँग्रेस नेत्यांकडून निवडणुकीवेळी भगव्याचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
काँग्रेसला पराभवाची भीती वाटू लागली आहे. तसे त्यांचेच आमदार उघडपणे सांगत आहेत. आगामी निवडणुकीनंतर काँग्रेस सरकार पडेल असा दावा त्यांनी केला.
या पत्रकार परिषदेला आमदार अभय पाटील, माजी आमदार संजय पाटील, भाजप महानगर जिल्हाध्यक्षा गीता सुतार, ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, राजशेखर डोणी, खासदार मंगला अंगडी, ॲड. एम. बी. जिरली, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवठगीमठ यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते.
0 Comments