बेळगाव / प्रतिनिधी 

राज्याच्या राजकारणात बेळगाव लोकसभेची निवडणूक हा राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेचा विषय बनलायं. बेळगाव म्हणजे मराठा प्राबल्य असं समीकरण असताना...या प्रतिष्ठेच्या लढतीत कोणं बाजी मारणारं? स्थानिक नसूनही माजी मुख्यमंत्री गड राखणारं की...युवा चेहरा इतिहास घडवणारं? याचा आढावा घेणारे हे विशेष वृत्त वाचा सविस्तर... 

बेळगाव लोकसभा मतदारसंघात तब्बल आठ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. तर या मतदारसंघाचा खरा 'गेमचेंजर' हा मराठाचं आहे. एकेकाळी भाजप म्हणजेच दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांचा गड मानला जाणारा हा मतदारसंघ जिंकणे ही आज एकप्रकारे भाजपची  'लिटमस टेस्ट' ठरणारं आहे. कारण  दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर २०२१ मध्ये झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत या मराठा मतांमुळे खासदार मंगला अंगडी यांची पुरती दमछाक झाली होती. परिणामी विजयासाठी भाजपला ८५ व्या फेरीपर्यंत वाट बघावी लागली होती. हीच मते आजही भाजपसाठी अवघड जागेचं दुखणं ठरू शकतात. तर काँग्रेसच्या दृष्टीने ही मोठी संधी असून येथूनच सत्ताधाऱ्यांना धोबीपछाड देण्याचे डावपेच त्यांनी आखले आहेत. 

अशा या राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील आणि महत्वाच्या बेळगांव मतदारसंघात नेमके कुणाचे पारडे  किती जड आहे, कुणाची किती मते आहेत आणि कुणाचे प्राबल्य आहे हे जाणून घेऊया. 

आतापर्यंतची परिस्थिती पाहता २०२१ च्या पोटनिवडणुकीत मराठा समाजाने ठरवले तर बेळगावचा निकाल बदलू शकतो, ही गोष्ट अधोरेखित झाली, त्यामुळे भाजप असो की काँग्रेस कोणत्याही राष्ट्रीय पक्षांनी बेळगावात मराठा समाजाला गृहीत धरू नये, हेच सिद्ध केले. 

आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाची सांख्यिकी पाहिली तर या मतदार संघात ९ लाख २० हजार पुरुष तर ९ लाख १५ हजार महिला अशी एकूण १८ लाख ३५ हजार ५९६  इतकी मतदारांची संख्या आहे. याठिकाणी जातीनुसार विचार केला तर हा मतदारसंघ महाराष्ट्राच्या सीमाभागात असल्याने येथे मराठा समाजाबरोबरच लिंगायत मतदारांचे वर्चस्व पाहायला मिळते. लिंगायत समाजाच्या पाठिंब्यामुळे या जागेवर सातत्याने भाजपला यश मिळत होते.

आजच्या घडीला या ठिकाणी साडेपाच लाख लिंगायत मते असून त्याखालोखाल ४ लाखांहून अधिक मराठा मते आहेत. त्यात  एससी /एसटी समाजाची २ लाख ८३  हजार तर मुस्लिमांचीही  तब्बल २ लाख २० हजार मते आहेत. त्यानंतर धनगर १ लाख ९० हजार, ब्राम्हण ६० हजार त्याचबरोबर उपारा, जैन, लमानी असे विविध जाती धर्माचे मतदार या मतदारसंघात आहेत. यामध्ये प्राबल्य पाहायला गेले तर लिंगायत साडेपाच लाख आणि त्याखालोखाल  ४ लाखांहून अधिक मराठा मतदार असून हाच समाज येथे निर्णायक ठरतो. त्यामुळे जातीय समीकरण लक्षात घेतल्यास आजही मराठा आणि लिंगायत हे दोन्ही समाज कुणाकडे जातात यावरच बेळगावचा निकाल लागणार आहे. 

उमेदवारीचा विचार केला तर एकीकडे काँग्रेसकडून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा पुत्र मृणाल यांना उमेदवारी मिळाल्याने लिंगायत मतांबरोबरच मराठा मते देखील काँग्रेसकडे वळतील असे म्हटले जाते. गेल्या काही दिवसांतील बेळगावचे राजकारण बघितले तर लिंगायत समाजाचे सगळे बडे नेते हे काँग्रेसच्या गोटात असून त्याचा नक्कीच त्यांना फायदा होईल असे चित्र आहे. तर दुसरीकडे भाजपमधील कुरघोडीचे  राजकारण आणि स्थानिक उमेदवार न देता बाहेरील उमेदवार लादण्याचा प्रयत्न यामुळे हा मतदारसंघ भाजपसाठी धोक्याचा ठरू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

बेळगांवमधून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, सतीश जारकीहोळी, लक्ष्मण सवदी ही दिग्गज नेतेमंडळी काँग्रेसकडे असल्याने त्यांच्यासाठी ही जमेची बाजू आहे. तर दुसरीकडे घराणेशाहीचा फटका त्यांना देखील बसू शकतो. 

आजपर्यंत लिंगायत समाजाने भाजपला एकमुखी पाठिंबा दिला होता. तर मराठा समाज देखील हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपच्या पाठीशी होता. त्याच बळावर बेळगावमधून सुरेश अंगडी हे चार वेळा खासदार म्हणून निवडून आले. मात्र, आता परिस्थिती बदलली असून काँग्रेसने लिंगायत समाजाला आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले आहे. 

या सगळ्यात सध्या लिंगायत समाज पूर्णपणे भाजपच्या पाठीशी ठाम राहील का? आणि मराठा मतांचा फायदा हा नेमका कुणाला होतो? हे पाहणे औत्सुक्याचे  ठरणार आहे. काँग्रेसने १९९९ ला बेळगावमध्ये शेवटची निवडणूक जिंकली होती. त्यानंतर आता कुठे त्यांना पुन्हा संधी दिसू लागली आहे.

एकंदरीत जातीच्या आधारावर बेळगाव लोकसभा मतदार संघावर लिंगायत समाजाचे वर्चस्व असले तरीही येथे मराठ्यांचे प्राबल्य अधिक असल्याने आगामी निवडणुकीत मराठा समाजाची मते निर्णायक ठरणारं हे मात्र नक्की...