- खासदार मंगला अंगडी यांची प्रतिक्रिया
बेळगाव / प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना पक्षाने बेळगावमधून उमेदवारी दिल्यास त्यांच्यासोबत प्रचार करणार असल्याचे खासदार मंगला अंगडी यांनी सांगितले. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीतही अंगडी कुटुंबियांच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे नाराज झालेल्या खा. मंगला अंगडी उमेदवारी विषयी चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेल्या होत्या. त्यानंतर आज बेळगावात परतल्यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आगामी लोकसभा निवडणुकीबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना खा. मंगला अंगडी पुढे म्हणाल्या, आमच्या कुटुंबाचे नाव दुसऱ्या यादीत आलेले नाही. त्यामुळे आम्ही हायकमांडला भेटण्यासाठी दिल्लीला गेलो होतो. तोपर्यंत जगदीश शेट्टर यांना तिकीट देण्याची चर्चा होती. त्यामुळे आम्ही दिल्लीहून परतलो आहोत. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना बेळगाव लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जवळपास निश्चित करण्यात आली आहे. भाजप हायकमांडने माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना बेळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची सूचना केली आहे. यानंतर आज जगदीश शेट्टर यांनी बेळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याबाबत माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावर बी.एस.येडियुराप्पा यांनीही शेट्टर यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे सांगितले आहे, त्यामुळे अगोदर बेळगावमधून निवडणूक लढवण्यास नकार दिलेल्या जगदीश शेट्टर यांनी अखेर बेळगावमधून निवडणूक लढवण्यास होकार दिल्याची माहिती उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपचे दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी यांनी पतीच्या निधनानंतर बेळगाव लोकसभा मतदार संघातून पोटनिवडणूक लढवली आणि त्या खासदार म्हणून निवडून आल्या. मात्र यावेळी त्यांनी स्वतःच्या मुलींना उमेदवारी मिळवून देण्याचा प्रयत्न केला. याविषयी बोलताना खा. मंगला अंगडी यांनी मुली श्रद्धा किंवा श्रीशा हिला उमेदवारी मिळावी अशी माझी इच्छा होती. पण उमेदवारी न मिळाल्याने थोडी निराशा झाली, पण सुरुवातीला असे होणे स्वाभाविक आहे, असे त्या म्हणाल्या.
शेट्टर यांच्या विरोधात 'गो बॅक शेट्टर' मोहिमेबाबत बोलताना खा. मंगला अंगडी यांनी ,शेट्टर यांचे कार्यकर्ते आणि आमदारांशी बोलणे झाले आहे.
पुढील यादीत जगदीश शेट्टर यांना बेळगाव मतदारसंघाचे तिकीट जाहीर होणार हे जवळपास निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.
0 Comments