• कणबर्गी गृहनिर्माणासाठी ५० कोटी राखीव


बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव नगर विकास प्राधिकरणाचा (बुडा) सन 2024-25 या वर्षाचा 384.46 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे.आज शुक्रवारी झालेल्या प्राधिकरणाच्या सर्वसाधारण सभा व अर्थसंकल्पीय सभेत या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली.
या अर्थसंकल्पात, कणबर्गी प्रकल्प (प्रकल्प क्रमांक 61) हाती घेण्यासाठी चालू आर्थिक वर्षात (2024-2025) रु.5000 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.नवीन गृहनिर्माण आणि विकास प्रकल्पासाठी रु.3000 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. महा योजना रस्ते आणि वाहतूक रिंग विकास कार्यशाळेसाठी 5000 लाख रुपये राखून ठेवले आहेत.
प्राधिकरणाच्या योजनेंतर्गत व्यापारी संकुलांच्या बांधकामासाठी रु.3500 लाख; शहरातील विविध उद्यानांच्या विकासासाठी 1500 लाख; शहरातील मुख्य तलावांच्या विकासासाठी 1500 लाख रुपये तर शहरातील सर्व तलावांच्या सुशोभीकरणाच्या कामांसाठी 500 लाख रुपयांचा निधी घेण्यात आला आहे.
तसेच शहरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी सीसी कॅमेरे बसवण्यासाठी 50 लाख रुपये आणि मोबाईल सीसी कॅमेरे बसवण्यासाठी 50 लाख रुपये; शहर सुशोभीकरणासाठी 500 लाख आणि कनबर्गी हाऊसिंग डिझाइन डेव्हलपमेंट स्कीम क्र: 61 लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर,आम.आसिफ (राजू) सेठ,आम.अभय पाटील, जिल्हाधिकारी नितेश पाटील, बुडा आयुक्त शकील अहमद आदी उपस्थित होते.