• खादरवाडी ग्रामस्थांचा पिरनवाडी नगरपंचायतीवर मोर्चा

बेळगाव / प्रतिनिधी 

विविध नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासह अवाजवी घरपट्टी कमी करण्याच्या मागणीसाठी बेळगाव तालुक्यातील खादरवाडी ग्रामस्थांनी आज पिरनवाडी नगरपंचायतीवर मोर्चा काढून निदर्शने केली. रस्ते, गटारी, पथदीप, समर्पक पाणी पुरवठा आदी नागरी सुविधा पुरवाव्यात आणि अवाजवी घरपट्टी कमी करावी या मागण्यांसाठी खादरवाडी ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते राकेश पाटील व उत्तर नेत्यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. 

खादरवाडी गाव विकासाच्या बाबतीत अत्यंत मागास आहे. येथे कोणत्याच सुविधा, विकासकामे झालेली नाहीत. ती त्वरित करावीत, कॉम्युटर उताऱ्यासाठी लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी केली जाते. कॉम्युटर उतारा नसेल तर घरपट्टी भरून घेणार नसल्याचे सांगून कॉम्युटर उतारा काढून घेण्यासाठी लाचेची मागणी केली जाते. याबद्दल निदर्शक ग्रामस्थांनी घोषणा देत संताप व्यक्त केला. यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हनुमंतय्या यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यांनी निवेदन स्वीकारून शक्य तितक्या लवकर ग्रामस्थांना नागरी सुविधा देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते राकेश पाटील म्हणाले की, खादरवाडी ग्रामस्थ सर्व प्रकारचा कर पिरनवाडी नगरपंचायतीला भारतात. मात्र गावाला सुविधा पुरविण्याकडे नगरपंचायत दुर्लक्ष करत आहे. गावात रस्ते, गटारी, पथदीपांची अवस्था दयनीय आहे. घरपट्टी तिपटीने वाढविण्यात आली आहे. तसेच कॉम्युटर उताऱ्यासाठी लाचेची मागणी करण्यात येते. त्याच्या निषेधार्थ आम्ही गावकऱ्यांनी हा मोर्चा काढला आहे. आमच्या मागण्या मान्य न केल्यास यापुढे आम्ही सर्व शेतकरी आमच्या कुटुंबकबिला व जनावरांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला. यावेळी खादरवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.