• ऊसाने भरलेला ट्रॅक्टर उलटल्याने दुर्घटना 
  • जखमी महिलेवर मिरज येथील रुग्णालयात उपचार 

कागवाड : गावातून कामावर जाणाऱ्या चार पादचारी महिलांवर ऊसाने भरलेला ट्रॅक्टर उलटल्याने झालेल्या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली. शेडबाळ (ता. कागवाड जि. बेळगाव) गावानजीक ही दुर्दैवी घटना घडली. 

चंपा लक्काप्पा तलकट्टी (वय ४५), भारती वडदले (वय ३०), मालू रावसाब ऐनापुरे (वय ५५) तिघीही (रा.शेडबाळ) अशी मृत महिलांची नावे आहेत. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेकव्वा नरसप्पा सरसाई या महिलेला महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच कागवाडचे आमदार राजू कागे यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघातग्रस्त महिलांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. 

त्यानंतर कागवाड पोलिसांनी अपघातस्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. 

या अपघातामुळे मिरज - जमखंडी महामार्गावर  काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र पोलिसांनी ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि ट्रॉली बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या घटनेची नोंद कागवाड पोलिस स्थानकात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत. 


या बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇