मुंबई : काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अशोक चव्हाण आज भाजपामध्ये प्रवेश करणार असून त्यांनी  स्वत: यावर शिक्कामोर्तब केले आहे. काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भेटून त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर लगेचच त्यांचा भाजपा प्रवेश होईल अशी चर्चा सुरु झाली होती. पण काल त्यांनी या वृत्ताचे  खंडन केले होते. आता अशोक चव्हाण यांनीच  भाजपामध्ये आज प्रवेश करणार असल्याच म्हटले आहे. 

आजपासून मी माझ्या राजकीय आयुष्याची पुनश्च: नव्याने सुरुवात करत आहे. आज मी रितसर भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, असे वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. ते  मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यापूर्वी घरातून निघताना अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत मी आज भाजपमध्ये प्रवेश करेन. भाजपच्या प्रदेश कार्यालयात अन्य काही  जिल्ह्यातील संभाव्य लोकांचे पक्षप्रवेश होतील. मात्र, मी आज काँग्रेसच्या कोणत्याही आमदाराला माझ्यासोबत येण्यासाठी निमंत्रण दिलेले नाही, असे चव्हाण यांनी सांगितले. 

मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दीकींपाठोपाठ एक माजी मुख्यमंत्री काँग्रेसमधून बाहेर पडल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीतील उभ्या फुटीनंतर महाविकास आघाडीतील तिसऱ्या पक्षालाही गळती लागल्याचे स्पष्ट झाले  आहे. चव्हाणांबरोबर आणखी काही नेते भाजपाच्या वाटेवर असल्याचेही सांगितले जात आहे.

  • अशोक चव्हाणांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी?

अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. चव्हाणांच्या पक्षप्रवेशानंतर भाजपकडून लगेचच राज्यसभा उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. अशोक चव्हाण यांच्यासोबत आज राजूरकर वगळता अन्य कोणताही विद्यमान आमदार भाजपमध्ये जाणार नाही. मात्र, राज्यसभा निवडणुकीत भाजपने चौथा उमेदवार उभा केल्यास अशोक चव्हाण गटातील काँग्रेस आमदारांकडून क्रॉस व्होटिंग होण्याची दाट शक्यता आहे. अनेक काँग्रेस आमदारांनी अशोक चव्हाण यांना फोन करुन आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगितले. परंतु, तुर्तास आम्हाला पक्षांतरबंदी कायद्यामुळे तुमच्यासोबत भाजपमध्ये येता येणार नाही. आम्ही योग्यवेळी तुमच्यासोबत येऊ, असे या काँग्रेस आमदारांनी अशोक चव्हाण यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.