- पोलीस असल्याचे सांगून पाच तोळे सोन्याचे दागिने लांबविले
खानापूर / प्रतिनिधी
शहरातील बुरुड गल्ली येथील रहिवासी असलेले पीटर फर्नाडिस आणि मारिया फर्नांडिस या वृद्ध दाम्पत्याला दोन दिवसांपूर्वी पारिश्वाड रस्त्यावर पुढे दंगा सुरू आहे आम्ही पोलीस आहोत तुमचे अंगावरील दागिने पिशवीत काढून ठेवा, असे सांगून पाच तोळ्याचे दागिने लुटल्याची घटना खानापूर शहरात घडली. अशा प्रकारची चोरी होण्याची ही पहिलीच घटना असून यामुळे खानापुरात अशा प्रकारच्या घटनांना सुरुवात झाली आहे. मात्र पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ केली आहे. याबाबत माहिती अशी की, शहरातील बुरुड गल्ली येथील वृद्ध दाम्पत्य पीटर फर्नांडिस (वय ८२) त्यांची पत्नी मारिया फर्नांडिस (वय ७९) हे दोघे औषधोपचार घेण्यासाठी पारिश्वाड रस्त्यावरून चालत निघाले होते.
यावेळी दुचाकीवरून दोघेजण आले आणि पुढे जांबोटी नाक्यावर मोठा दंगा सुरू आहे. तुम्ही तिकडे जाऊ नका दागिने असतील तर काढून ठेवा, असे सांगितले, मारिया यांनी आपल्या गळ्यातील चार तोळ्याचे गंठण काढून पिशवीत ठेवले नंतर पीटर यांनी आपली गळ्यातील
चेनही पिशवीत ठेवण्यासाठी काढली त्याचवेळी चोरट्याने पिशवीतून दागिने काढून दुचाकीवरून पळ काढला. वृद्ध दाम्पत्याला आपण फसलो आहोत याची कल्पना आल्याबरोबर त्यांनी आपल्या घरी जाऊन ही घटना आपल्या मुलाला सांगितली. त्यानंतर मुलगा रोनाल्ड यांनी पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतली आहे. मात्र अद्याप गुन्हा नोंद करण्यात आला नाही.
0 Comments