सुळगा (हिं.) / वार्ताहर 

सुळगा (हिं.) ता. बेळगाव येथील श्री मसणाई देवी मंदिराची वास्तूशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा देवस्की पंच कमिटी, युवा वर्ग, सुळगा ग्रामस्थ आणि समस्त देणगीदारांच्या अमृतमय सहकार्यातून येत्या रविवारी दि. ११ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित केला आहे.  सर्वांच्या बहुमुल्य सहकार्यातून या मंदिराचे काम पूर्णत्वास गेले आहे.  

सदर मंदिराच्या कळसाची  मिरवणूक शनिवार दि. १० फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ४.०० वा. संपूर्ण सुळगा गावात काढली जाणार आहे. त्याचबरोबर मंदिराची वास्तूशांती, कळसारोहण, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि मंदिर उद्घाटन सोहळा रविवार दि. ११ फेब्रुवारी २०२४ रोजी संपन्न होणार आहे. कळसारोहण करण्यासाठी परमपूज्य श्री हरी गुरु महाराज रुद्रकेसरी मठ, बेळगाव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सर्व विधी पुरोहितांच्या मंत्रघोषात, देवस्की पंचकमिटी, संपूर्ण युवावर्ग आणि समस्त सुळगा ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणारआहेत. त्यानंतर महाप्रसादाने सर्व कार्यक्रमांची सांगता होणार आहे. 

तरी दि. १० आणि ११ फेब्रुवारी २०२४ रोजी श्री मसणाई मंदिराच्या आवारात सर्व ग्रामस्थ , बाळगोपाळ, युवक, जेष्ठ मंडळी, महिला, देवस्की पंच कमिटीचे आजी - माजी सदस्य, ग्रा.पं. सुळगा (हिं.) चे आजी - माजी सदस्य, ग्रामविकास मंडळाचे सर्व पदाधिकारी, आजी - माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी, तसेच  मंदिराचे कार्य पूर्ण होण्यासाठी देणगी दिलेल्या सर्व ज्ञात - अज्ञात देणगीदारांनी सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून या कार्यक्रमांची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.