बेळगाव : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त हिंडलगा कारागृहासमोर त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यास मज्जाव करणाऱ्या कारागृह अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ श्रीरामसेना बेळगावच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.

दरवर्षी प्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त सोमवार दि. २६ फेब्रुवारी रोजी श्री रामसेना प्रमुख तसेच कार्यकर्ते हिंडलगा कारागृह समोर वीर सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यासाठी गेले होते. मात्र तेथील  कारागृह अधिक्षकांनी पूजनास विरोध केला. त्यावेळी गेली कित्येक वर्षे श्री राम सेना बेळगावचे कार्यकर्ते हा पूजनाचा कार्यक्रम करत असून त्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती करण्यात आली. तरी देखील 'आता सरकार बदलले आहे तुम्ही पूजन करायचे नाही', असे सांगून अधिक्षकांनी वीर सावरकर प्रतिमा पूजनास मज्जाव केला . त्यामुळे संतप्त झालेल्या सर्व कार्यकर्त्यांनी संबंधित कारागृह  अधिक्षकांचा धिक्कार करत कारागृहासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर कारागृहा समोरील रस्त्यावर स्वातंत्रवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी श्रीराम सेना बेळगावचे नेते रविकुमार कोकितकर आणि भाजप ग्रामीण अध्यक्ष धनंजय जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.