- बेळगाव तालुक्यातील मराठा समाजाची मागणी
- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात झाली बैठक
बेळगाव / प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव तालुक्यातील मराठा समाजाची बैठक आज कॅम्प मधील गंगाधर शानभाग हॉलमध्ये पार पडली. या बैठकीत बेळगाव मतदार संघातून लोकसभा निवडणुकीकरिता माजी आमदार संजय पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी करून यासंदर्भात भाजपच्या जिल्हा, राज्य आणि देश पातळीवरच्या नेत्यांना प्रदेशाध्यक्षांना भेटून निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार संजय पाटील हे सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे नेते असल्याने या लोकसभा निवडणुकीत त्यांनाच उमेदवारी द्यावी अशी बेळगाव तालुक्यातील मराठा समाजाची आग्रही भूमिका आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बेळगाव तालुक्यातील मराठा समाजाचे संयोजक विनय कदम म्हणाले, जर येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाकडून विद्यमान खासदार मंगला अंगडी यांना उमेदवारी दिली जाणार नसेल तर समाजामध्ये कोणताही भेदभाव न सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेते अर्थात बेळगाव ग्रामीण मतदार संघाचे माजी आमदार संजय पाटील उमेदवारी द्यावी अशी मागणी आहे. यासाठीच आज ग्रामीण मतदारसंघातील मराठा समाजाची आणि युवकांची बैठक घेतली आहे असे त्यांनी सांगितले. बेळगाव ग्रामीण मतदार संघात दोनवेळा आमदार म्हणून निवडून आलेले संजय पाटील यांची मराठीसह इतर भाषांवरही चांगली पकड आहे. याशिवाय आमदारकीच्या काळात त्यांनी समाजाच्या अनेक समस्या सोडवल्या आहेत. बेळगाव लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाचे ५.५० लाख मतदार आहेत. त्यामुळे मा. आमदार संजय पाटील यांना उमेदवारी दिल्यास त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय संजय पाटील यांच्या लोकसभा उमेदवारीच्या मागणीसाठी आम्ही पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना भेटून निवेदन देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बेळगाव तालुका वारकरी सेवा संघाचे परशराम तुप्पट म्हणाले, सर्व समाजांना आणि सर्व भाषिकांना सोबत घेऊन जाणारी नेतृत्व अशी माजी आमदार संजय पाटील यांची ओळख आहे. आमदार म्हणून बेळगाव ग्रामीण मतदार संघाचे नेतृत्व करताना तसेच आमदार नसतानाही त्यांनी आमच्या समाजाचे प्रश्न - समस्या सोडविल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही भाजप पक्षात विविध पदांवर कार्यरत असलो. तरी मराठा समाजाचे असे विशेष नेतृत्व अद्यापही तयार झालेले नाही. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीसाठी संजय पाटील यांनाच उमेदवारी द्यावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी बेळगाव ग्रामीण महिला मोर्चा माजी अध्यक्षा ज्योती कुलकर्णी म्हणाल्या, संजय पाटील हे मराठी व कन्नड भाषिक हिंदुत्ववाद्यांना एकत्र घेऊन जाणारे असे नेतृत्व आहे. त्यामुळे मराठा समाजाचे हित आणि समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून माजी आमदार संजय पाटील यांनाच लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीला बेळगाव तालुक्यातील अनेक माजी तालुका, जिल्हा पंचायत सदस्य, ग्रामपंचायत अध्यक्ष - उपाध्यक्ष व सदस्य, मराठा समाजाचे नेते, यांच्यासह लोकसभा ग्रामीण मंडळ संचालक युवराज जाधव, बेळगाव जिल्हा प्रकोष्ठ संचालक दिनेश पाटील, यल्लाप्पा कळभट, कुद्रेमणी ग्रा. पं. अध्यक्ष संजय पाटील, बेनकनहळळी ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, निलजी ग्रा. पं. अध्यक्ष हेमंत पाटील, महेश रेडेकर, स्नेहलता कोळेकर, अर्चना पाटील, रंजनाताई कोलकार, भाजप जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस चेतन पाटील, उमा देसाई, हनुमंत पाटील, राजू पोटे आदि मराठा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments