- फलक हटविण्याच्या मागणीसाठी बेळगाव महापालिकेसमोर निदर्शने
बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने राज्यातील सर्व आस्थापने, दुकानांच्या नामफलकांवर ६०% जागेत कन्नड मजकूर लिहिण्याची सक्ती केली आहे. तेव्हापासून बेळगावात कन्नड नामफलकांवरून कन्नड संघटनांची वळवळ वाढली आहे. शहरातील व्यापारी-व्यावसायिकांनी ग्राहकांना समजेल अशा इंग्लिश व अन्य भाषेत स्वतःच्या दुकानांचे नामफलक लावले आहेत. त्यामुळे कन्नड संघटनांना पोटशूळ उठला आहे. आता तर या संघटना अधिकच आक्रमक होऊन कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्याचप्रमाणे करुनाडू विजयसेने नामक संघटनेने अनगोळमधील जय महाराष्ट्र चौकाचा बोर्ड हटवण्याच्या मागणीसाठी आज, गुरुवारी महापालिकेसमोर निदर्शने केली. गोंधळ घालत पालिकेच्या प्रवेशद्वारातच ठिय्या मांडून घोषणाबाजी केली. या निदर्शकांची पालिका आयुक्त पी. लोकेश यांनी भेट घेऊन सरकारच्या निर्देशानुसार नामफलकांवर कन्नडला अधिक प्राधान्य देण्याची सूचना करणाऱ्या नोटीसा महापालिकेने सर्व व्यापारी- व्यावसायिकांना पाठवल्या आहेत. शिवाय जाहीर निवेदनही केले आहे. कन्नडेतर बोर्ड हटविण्याची कारवाईही सुरु केली असल्याचे सांगितले. मात्र निदर्शक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे आयुक्तांनी त्यांना ठणकावले.
आम्ही दोन महिन्यांपूर्वी पालिकेला कन्नड नामफलकांच्या सक्तीबाबत निवेदन दिले आहे. मात्र तरीही त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचा आक्षेप घेत आंदोलकांनी महापालिकेच्या दारातच ठाण मांडले. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना करुनाडू विजयसेनेचे रवी यांनी सांगितले की, बेळगाव महानगर पालिकेच्या हद्दीत सर्व दुकाने, आस्थापनांवर कन्नडला प्राधान्य देणारे नामफलक लावण्याची सक्ती करणारा आदेश सरकारने जारी केला आहे. त्याशिवाय या संदर्भात कन्नड संघटनांनी वारंवार आंदोलने केली आहेत. करुनाडू विजयसेनेने दोन महिन्यांपूर्वी पालिकेला पत्र देऊन कार्यवाहीची मागणी केली आहे. मात्र दोन महिन्यात एकही कार्यवाही पालिकेने केलेली नाही. अनगोळमधील जय महाराष्ट्र चौक हा मराठी भाषेत फलक आहे तो हटवलेला नाही. तो हटवावा अशी मागणी केली.
0 Comments