• 'जनस्नेही पोलिस' संकल्पनेतून पोलिसस्थानक बनले स्मार्ट  

बेळगाव / प्रतिनिधी  

'जनस्नेही पोलिस' या संकल्पनेतून बेळगावच्या माळमारुती पोलिस स्थानकाचा कायापालट झाला आहे. सदर पोलिस स्थानक आता लोकाभिमुख, जनस्नेही  बनले आहे. येथील अतिथी कक्षाच्या भिंतींवर बुद्ध बसवण्णा, सिद्धेश्वर स्वामीजींच्या आदर्शाची आकर्षक चित्रे रेखाटण्यात आली आहेत. शिवाय पोलीस यंत्रणेची आवश्यक माहिती देणारे भिंतीवर लावलेले आकर्षक फलक, बोधचित्रे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

या पोलीस स्थानकाच्या अतिथी कक्षाचे पोलिस आयुक्त सिद्धरामप्पा यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. शहर पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी अतिथी कक्ष उभारणीत आर्थिक मदत करणाऱ्या प्रभाकर शेट्टी, गिरीश, अनिल पटेल, मुथुराजू, अफजल बेगम यांचा गौरव केला. याप्रसंगी माळमारुती व एपीएमसी पोलिस स्थानकातील  कर्मचाऱ्यांच्याहस्ते पोलिस आयुक्त सिद्धरामप्पा यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना पोलिस आयुक्त सिद्धरामप्पा म्हणाले, माळमारुती पोलिस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर म्हणून आल्यापासून जे. एम. कालीमिर्ची यांनी बरेच सकारात्मक बदल केले आहेत, त्यांनी माळमारुती पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या अशोक नगर, रामतीर्थ नगर आणि ऑटो नगरमध्ये चांगले वातावरण निर्माण केले आहे, त्यांनी जनतेच्या मनातील भीती दूर केली आहे. त्यांनी या भागातील चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणले आहे. पोलीस विभागाच्या कामाबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम खरोखरच कौतुकास्पद असून, हा जनतेचा विजय झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला एसीपी गंगाधर, पोलिस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, मार्केट आणि माळमारुतीचे पोलीस कर्मचारी, प्रभाकर शेट्टी, गिरीश, अनिल पटेल अफजल बेगम उपस्थित होते.