बेळगाव / प्रतिनिधी
सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीची तारीख निश्चित झाली आहे. १५ फेब्रुवारीला बेळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. बेळगाव महापालिकेच्या विद्यमान महापौर शोभा सोमणाचे व उपमहापौर रेश्मा पाटील यांचा कार्यकाळ सोमवारी संपुष्ठात आला. महापौर व उपमहापौर म्हणून कामकाजाचा सोमवारी त्यांचा अखेरचा दिवस होता. त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी म्हणजे सोमवारी नव्या महापौर व उपमहापौरांची निवड होणार नाही. त्यामुळे मंगळवारपासून काळजीवाहू महापौर - उपमहापौर असणार की प्रशासक नियुक्त केले जाणार? याबाबत मोठी उत्सुकता होती. मात्र आता तारीख निश्चित झाल्याने महापौर - उपमहापौर निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
याबाबत महापालिकेच्या सर्व नगरसेवकांना नोटिसा पाठवल्या आहेत. महापौरपद अनुसूचित जाती महिलांसाठी तर उपमहापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. भाजपच्या कार्यकाळातील हा दुसरा महापौर आहे. यावेळी बेळगाव उत्तर मतदारसंघात महापौर आणि दक्षिण मतदारसंघात उपमहापौर असतील.
0 Comments