बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगावसह सीमाभागातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी शिवाजी विद्यापीठाने खास योजना जाहीर केली आहे. आर्ट्स, कॉमर्स,सायन्स या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सीमाभागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात १०० टक्के सूट, तसेच वसतिगृह शुल्क माफ केले जाणार आहे. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमासाठीच्या शुल्कात २५ टक्के सवलत व वसतिगृह शुल्क माफ केले जाणार आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

तंत्रज्ञान व अभियांत्रिकी अभ्यासक्रम वगळता इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा विद्यापीठ स्तरावर घेतल्या जातात. यासंदर्भात विद्यार्थ्यांना सूचना केली जाणार आहे. विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी अंतर्गत बी.टेक, एम.टेक तसेच पीएचडी हे इंजिनिअरिंगमधील कोर्सेस राबविले जातात. यापैकी बी.टेक व एम.टेक या कोर्सेसना प्रवेश मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाची एमएचटी सीईटी देणे अनिवार्य आहे.

या प्रवेश परीक्षेच्या आधारावर सीमाभागातील ज्या विद्यार्थ्यांना डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे, त्यांना वरील सवलतींचा लाभ मिळणार आहे. 

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील पियुसी मॅथ्यस् सहित सायन्स परीक्षेसाठी बसत असलेल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाची एमएचटी सीईटी परीक्षा देणे अनिवार्य आहे. सदर परीक्षेचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख ९ मार्च असून त्यापूर्वी बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी नोंदणी करणे गरजेचे आहे. परीक्षा दिल्यानंतर प्रवेश मिळाल्यास या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अर्ज करून या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले आहे.