बेळगाव / प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या योजनांची शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे उद्या १२ फेब्रुवारीपासून देशभरात गाव परिक्रमा यात्रेला प्रारंभ होणार असून बेळगावातही या यात्रेचा शुभारंभ होणार असल्याचे भाजप नेते ॲड. एम.बी.जिरली यांनी सांगितले.
रविवारी बेळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छेनुसार ही ग्रामपरिक्रमा यात्रा सुरू आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा उद्या दि. १२ फेब्रुवारी रोजी उत्तरप्रदेशमध्ये देशातील सर्व भागात एलईडीद्वारे या ग्रामपरिक्रमा यात्रेचे उद्घाटन करतील. गोमातेचे पूजन करून तसेच शेतीची अवजारे देऊन कार्यक्रमाला सुरुवात होईल. यानंतर गावातील हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यावर लोकांना शेतकरी केंद्रित प्रकल्पांची माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
केंद्राकडून नैसर्गिक शेतीवर अधिक भर देण्यात आला आहे. त्यामुळे २३ पिकांसाठी किमान आधारभूत किंमत व फसल विमा योजनेसाठी ४८ कोटी कर्जापैकी १.४ कोटी थेट शेतकऱ्यांपर्यंत रोख हस्तांतरणाद्वारे वितरित करण्यात आले आहेत. किसान सन्मान योजनेद्वारे २०२१ ते २०२३ पर्यंत ९३,०६३ कोटी रू. दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाणीबचतीचे ९ संकल्प, खेड्यापाड्यात डिजिटल पेमेंट, स्वच्छता मोहीम, मेड इन इंडिया, देशांतर्गत पर्यटन, नैसर्गिक शेती जागृती, बागायत धान्य जागृती, ग्रामीण खेळांना प्रोत्साहन, दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी मदत अशा ९ संकल्पांची लोकांना माहिती करून दिली जाणार असल्याचे ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेला भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील,बसवराज कुंडगोळमठ,दुंडाप्पा बेंदवड, कल्लाप्पा शहापूरकर, प्रदीप सनिकोप्प, राजशेखर डोणी आदि उपस्थित होते.
0 Comments