• उपाध्यक्षपदी ॲड. बसवराज मुगळी , ॲड. शितल रामशेट्टी आणि ॲड. विवेक व्ही.पाटील यांना समसमान मते

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव बार असोसिएशनसाठी शुक्रवारी झालेल्या चुरशीच्या लढतीत अध्यक्षपदी ॲड.  एस. एस. किवडसण्णावर यांना एकूण  १६३२ मते पडली त्यांनी २४२ मतांच्या फरकाने बाजी मारली. अध्यक्षपदाच्या एका जागेसाठी ॲड. सुधीर जैन, ॲड. एस. एस. किवडसण्णावर आणि सुनील सानिकोप्प असे तिघेजण रिंगणात होते. 

तर उपाध्यक्षपदी बसवराज मुगळी यांची निवड झाली असून त्यांना ८९९ मते मिळाली. ॲड. शितल रामशेट्टी आणि ॲड. विवेक व्ही. पाटील यांना ४२१ इतकी समसमान मते मिळाल्यामुळे दोघांनाही एका एका वर्षासाठी विभागून हे पद देण्यात आले आहे. 

जनरल सेक्रेटरीपदी वाय.के.दिवटे यांनी बाजी मारली. त्यांना ४६२ इतकी मते मिळाली. जॉईंट सेक्रेटरी म्हणून विश्वनाथ सुलतानपुरे निवडून आले असून त्यांना ५४४ मते मिळाली. तर  कमिटी सदस्य पदासाठी एकूण १३  जणांनी अर्ज केले होते. यापैकी सुमित अगजगी ८७३, ॲड. इराप्पा पुजार ६९९, विनायक निंगनूर ६८०, सुरेश नागगनुरे ६७० आणि अनिल पाटील ६८० या पाच जणांनी विजय मिळवला आहे. 

महिला प्रतिनिधी म्हणून ४८८ मते मिळवत अश्विनी हवालदार यांनी दिमाखदार कामगिरी केली. बेळगाव बार असोसिएशनची निवडणूक शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ५ वा. पर्यंत पार पडली. मतदानप्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास निवडून आलेल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. निकालाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विजयी उमेदवारांना समर्थकांचा जल्लोष सुरु झाला होता.

अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणा-या ह्या निवडणुकीसाठी गेल्या महिन्याभरापासून इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती. एकूण ११ जागांसाठी ३७ उमेदवार रिंगणात होते. जेएमएफसी न्यायालयातील वकील समुदाय भवन येथे पार पडलेल्या निवडणुकीनंतर सायंकाळी साडेपाच वाजल्यानंतर मतमोजणी हाती घेण्यात आली होती. निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. आर. बी. मिरजकर यांनी काम पाहिले.