• काकती येथील महिलेला अटक
  • १२ लाख ३१ हजार रुपये किंमतीचे दागिने जप्त 
  • कॅम्प पोलिसांची कारवाई 

बेळगाव / प्रतिनिधी 

वृद्धेच्या सांभाळासाठी नियुक्त केलेल्या एका परिचारिकेने घरातील सुमारे सव्वाबारा लाख रुपयांचे दागिने पळविल्याची घटना कॅम्प येथे घडली होती. या चोरी प्रकरणी कॅम्प पोलिसांनी काकती येथील महिलेला अटक केली आहे. तिच्याजवळून १७५ ग्रॅम सोने व ५० ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. कॅम्पचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली असून चोरी प्रकरणाचा छडा लावणाऱ्या पथकाला पोलिस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी रू. १००००/- चे रोख बक्षीस जाहीर केले आहे.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अवघ्या तीन दिवसात चोरी प्रकरणाचा छडा लागला आहे. कॅम्प येथील रुक्साना जाल नांजी यांनी आपल्या आईच्या सांभाळासाठी होम नसिर्गिंची सेवा पुरविणाऱ्या एका परिचारिकेची नियुक्ती केली होती. ५ जानेवारीपासून श्रीदेवी प्रकाश माळगी (वय २९, मूळ रा. सुलधाळ, सद्या  रा. काकती) ही रुक्साना यांच्या घरी सेवा देत होती. ४ फेब्रुवारीच्या दुपारी १ पर्यंत या महिलेने रुक्साना यांच्या घरातील रू १२ लाख ३१ हजार रुपये किमतीचे दागिने पळविल्याचे उघडकीस आले आहे.

मंगळवारी श्रीदेवीला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता तिने चोरीची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तिच्याजवळील 12 लाख 31 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले. या घटनेने कॅम्प परिसरात खळबळ माजली असून प्रकरणाचा छडा लावणाऱ्या पोलीस पथकाचे आयुक्तांनी कौतुक केले आहे.