खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील कणकुंबी नजीक बेटणे गावाजवळ गोवा राज्य मार्गावर गोव्याकडे जाणारा (एम सॅंड) वाळूने भरलेला टिप्पर पलटी होऊन चालक जागीच ठार झाला. आज सोमवार दि. 19 फेब्रुवारी रोजी दुपारी ही घटना घडली. गजानन विष्णू चौगुले (वय २४ रा. गणेबैल ता. खानापूर) असे मृत चालकाचे नाव आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार गजानन हा वाळूचा टिप्पर (GA 04 T 3583) घेऊन जांबोटी मार्गे गोव्याकडे जात असताना, रस्त्यावरील खड्डा चुकवताना नियंत्रण सुटल्याने बेटणेनजीक टिप्परची झाडाला जोराची धडक बसली. त्यामुळे टिप्पर पलटी होऊन गजानन विष्णू चौगुले हा जागीच ठार झाला. टिप्परमध्ये वाळू भरलेली असल्याने त्याला बाहेरही पडता आले नाही. अपघात झाल्यानंतर उपस्थित नागरिकांनी बाहेर काढण्याचे फार प्रयत्न केले. मात्र वाळू भरलेली असल्याने त्यांना अपयश आले.
घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक रामचंद्र नायक, एएसआय एन.के.पाटील, चालक वासू पारसेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर घटनेची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, काका असा परिवार आहे. त्याच्या अपघाती निधनामुळे गणेबैल व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
भाजपाचे युवा नेते पंडित ओगले यांनी सदर मृत युवकाच्या वडिलांना घेऊन आज सायंकाळी खानापूर पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी खानापूर प्राथमिक आरोग्य चिकित्सा केंद्रात आणण्यात आला आहे. उद्या मंगळवार दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी, शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
0 Comments