विजयपूर / दिपक शिंत्रे 

कर्नाटकातील प्रसिद्ध संस्था बीएलडीई संस्थेच्या बी.एम.पाटील वैद्यकीय महाविद्यालय व हाॅस्पिटलच्या आरोग्य भाग्य योजनेअंतर्गत जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे सदस्य, पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय मदतीसाठी हेल्थ कार्डचे वितरण संस्थेचे अध्यक्ष व जिल्हा पालकमंत्री एम बी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

बीएलडीई संस्थेच्या सभागृहात झालेल्या या समारंभात बोलताना जिल्हा पालकमंत्री व संस्थेचे अध्यक्ष डॉ. एम. बी. पाटील म्हणाले, पत्रकारितेच्या या स्पर्धात्मक युगात पत्रकार हे नेहमीच दडपणाखाली कार्य करीत असतात. वेळप्रसंगी आपल्या प्रकृतीकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नसतो त्यांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने ही सेवा देण्यात येत असून या हेल्थकार्डद्वारे पत्रकार त्यांचे माता, पिता, पत्नी व दोन मुलांना विविध वैद्यकीय सेवा मोफत पुरविण्यात येणार असून, काही वैद्यकीय तपासणी अल्पदरात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले.

तर याप्रसंगी बोलताना जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संगमेश चुरी म्हणाले, डॉ. एम.बी. पाटील यांनी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील पत्रकारांना हेल्थ कार्ड देण्याचे आश्वासन दिले होते, ते त्यांनी पूर्ण केले असून समस्त पत्रकारांच्या वतीने आभार व्यक्त करुन अलिकडेच निधन झालेले पत्रकार शरणू पाटील व अब्दुलरजाक शिवनगी यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री निधीतून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे तसेच नगराभिरुद्धी प्राधिकाराच्यावतीने वाटप करण्यात येणारे ओपन प्लॉट पत्रकारांना सवलतीच्या दरात मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी केली.

याप्रसंगी बीएलडीई डिम्स विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ.आर.एस. मुधोळ, प्रा. डॉ अरविंद पाटील, सह कुलपती डॉ. वाय. एस. जयराज, पालकमंत्र्यांचे संपर्क प्रमुख डॉ महांतेश बिरादार, महेश शटगार, पत्रकार संघाचे मुख्य सचिव मोहन कुलकर्णी, राज्य कार्यकारिणी सदस्य डी.बी. वडवडगी, उपाध्यक्ष इंदुशेखर मणूर, फिरोज रोजिनदार, सह खजिनदार दिपक शिंत्रे,गुरु गद्धनकेरी, अशोक यडहळ्ळी, तालुका अध्यक्ष व पदाधिकारी तसेच पत्रकार उपस्थित होते.