बेळगाव / प्रतिनिधी
प्रेम प्रकरणावरून फिल्मी स्टाईलने दोन गटात तुफान हाणामारी झाली. नावगे (ता. बेळगाव) येथे बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत सोमवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी सहाहून अधिक आरोपींना अटक केली आहे.
दरम्यान बंदुका, तलवार आणि रॉड घेऊन आलेल्या ३० हून अधिक मुखवटाधारी तरुणांनी नावगे येथे हैदोस घालत ४ घरांवर दगडफेक करून जोरदार हल्ला चढवला आणि तोडफोड केली. यामध्ये घराच्या खिडक्यांच्या काचा व भिंतीला लावलेल्या फरशा फुटल्या असून घरासमोर उभ्या असलेल्या तीन कार आणि सहा दुचाकींचेही नुकसान झाले आहे. सदर हल्लेखोरांनी गावातील आजी-माजी ग्रा. पं. सदस्यांच्या घरावरही हल्ला केला आहे.
गावातील पंचांनी मध्यस्थी करून दोन्ही गटातील युवकांना समजावून भांडण सोडवले. तरीही आम्ही तुम्हाला बघून घेऊ असा इशारा नावगे गावातील तरुणांनी बहाद्दरवाडी गावातील तरुणांना दिला. या पार्श्वभूमीवर बहाद्दरवाडी गावातील तरुणांनी नावगे गावात घुसून घरांवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घटनेनंतर पोलिस उपायुक्त रोहन जगदीश, दोन सहाय्यक पोलिस आयुक्त यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सध्या गावात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
0 Comments